एसटी महामंडळाची लालपरी आता लवकरच नव्या आकर्षक लूकमध्ये नजरेस येणार आहे. एसटीच्या या आरामदायी बस या महिन्यातच विविध मार्गावर धावताना बघायला मिळणार आहेत.
राज्यात अशा प्रकारच्या ७०० बस आणण्याचेे महामंडळाचे लक्ष्य आहे. मुंबई, नागपूरसह पुणे आणि औरंगाबादमध्येही अशा प्रकारच्या बस बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. बसमध्ये विशिष्ट प्रकारच्या स्टीलचा वापर करण्यात आल्याने ही बस लालपरीच्या तुलनेत अधिक मजबूत राहणार आहे. बसमध्ये दोन बाय दोनच्या ४४ तसेच चालक, वाहकांसाठी वेगळ्या दोन अशा एकूण ४६ सीट असतील. या सीट पुशबॅक असतील. सामान ठेवण्यासाठी वेगळी व्यवस्था, मोठ्या खिडक्या यामुळे प्रवाशांना प्रवास करताना निसर्गाचा आनंद घेता येणार आहे.
बसला सॅटेलाइट सेंट्रल सर्व्हर जोडले जाणार असून, व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम लावण्यात येणार असल्यामुळे बसच्या लोकेशनची माहितीही प्रवाशांना मिळणार आहे. या सुविधेमुळे बसमधील प्रवाशांना आपत्कालीन स्थितीत तत्काळ मदत उपलब्ध होऊ शकणार आहे. आधुनिक बनावटीच्या या बसमध्ये उद्घोषणा होणार असल्याने प्रवाशांना वेळोवेळी माहिती मिळणार आहे. चालक प्रवाशांसोबत माईक सिस्टमवरून संपर्कात राहणार आहे.