नवी दिल्ली- आयपीएल सामन्यांच्या प्रसारण हक्कांसाठी लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली. यामध्ये वायकॉम18 ग्रुपने तीन गटाचे अधिकार जिंकले आहेत. या लिलाव प्रक्रियेनंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक नीता अंबानी यांनी आयपीएल जगभरातील प्रत्येक क्रिकेट प्रेमीपर्यंत पोहचवण्याचं मिशन असल्याचे सांगितले.
आयपीएलच्या 2023 ते 2027 या कालावधीसाठी सर्व कॅटेगरीची लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली. बीसीसीआयने यंदा चार ग्रुपमध्ये मीडिया हक्क विकण्याचा निर्णय घेतला होता. पहिला गट भारतातील टीव्ही मीडिया अधिकारांचा होता आणि यासाठी 23,575 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली आहे. दुसरा गट ओटीटी प्लॅटफॉर्मवर टेलिकास्ट अधिकारांचा होता आणि त्यासाठी 20,500 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली.
तिसरा गट विशेष श्रेणीतील सामन्यासाठी होता, ज्यासाठी 3,258 कोटी रुपयांची बोली लावली गेला. तर, चौथा गट विदेशी प्रसारण हक्कांसाठी होता ज्यासाठी 1,057 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली.
प्रसारण हक्कांसाठी लिलावप्रक्रिया नुकतीच पार पडली असून यातून भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड अर्थात बीसीसीआयने (BCCI) तब्बल 48 हजार कोटी 390 रुपये मिळवले आहेत. टिव्ही आणि डिजिटलर हक्क वेगवेगळ्या कंपनीला मिळाले आहेत. स्टार स्पोर्ट्स ने आयपीएलचे टिव्ही हक्क आणि व्हायकॉम्18 समूहाने डिजिटल राइट्सचे हक्क मिळवले आहेत. त्याशिवाय वायकॉम18 ने स्पेशल कॅटेगरी राइट्स आणि वायकॉम18 आणि टाईम्स इंटरनेटनं परदेशी मीडिया अधिकार विकत घेतले आहेत.
नीता अंबानी यांनी बुधवारी वायकॉम18 च्या एका अधिकृत जाहिरातीच्या माध्यमातून आपला संदेश दिला. त्या म्हणाल्या की, ‘क्रीडा क्षेत्र आपले नेहमीच मनोरंजन करते. त्याशिवाय खेळातून आपल्याला प्रेरणा मिळते त्याशिवाय खेळामुळे आपण सर्वजण एकत्र येतो. क्रिकेट आणि आयपीएल हे सर्वक्षेष्ठ खेळ आहेत. ते जगात भारताचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळेच आयपीएल आणि क्रिकेटसोबत जोडलं गेल्यामुळे अभिमान वाटतोय. आयपीएल लीगला जगभरात प्रत्येक क्रीडा प्रेमीपर्यंत पोहचण्याचं आमचं मिशन आहे’