पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संसदेत आपल्या भाषणात महाराष्ट्रामुळे कोरोनाचा प्रसार झाला असे विधान केले. काँग्रेसने मजुरांना तिकीट काढून देऊन महाराष्ट्रातून बिहार-उत्तर प्रदेशमध्ये पाठवून कोरोना पसरवण्याचं काम केलं, असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले.
या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राबद्दल केलेल्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.
प्रशांत जगताप म्हणाले, “उत्तरप्रदेशच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले हे वक्तव्य महाराष्ट्राचा अपमान करणारे आहे. या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात वाद निर्माण होऊ शकतो. याचा फटका नक्कीच आगामी निवडणुकीत भाजपला बसणार आहे. पंतप्रधान राज्यात किंवा इतर कुठल्या ठिकाणी असताना त्यांनी असे वक्तव्य करणे हे चुकीचे आहे”