येरवडा कारागृहातील बराकीत आढळला मोबाईल फोन

463 0

येरवडा कारागृहातील एका बराकीमधील बाथरुममध्ये मोबाईल फोन आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली.

याप्रकरणी कारागृह विभागाच्या वतीने सागर बाजीराव पाटील (वय ३८, रा. जेल वसाहत, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारागृहातील अधिकारी भिरु सोमनाथ खळबुटे, अतुल तोवर हे कारागृहातून सर्कल क्रमांक १, बरॅक क्रमांक ३ मधील बाथरुमची झडती घेत असताना तेथील बाथरुमच्या वर फिर्यादी यांना पत्रा वाकलेला दिसला. त्या ठिकाणाची झडती घेतली असता तेथे एक काळ्या रंगाचा नोकिया कंपनीचा मोबाईल आढळून आला.

ही बाब अधिकार्‍यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना कळविली. कारागृह विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी याबाबत दोषींवर कारवाईसाठी तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. हा मोबाईल नेमका कोणी ठेवला होता. त्यावरुन कोण, कोण कोणाशी बोलले, याची माहिती घेतली जात आहे. त्यानंतर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अशोक काटे तपास करीत आहेत.

येरवडा कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

३ एप्रिल रोजी येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली होती. हा प्रकार येरवडा कारागृहातील किशोर विभागातील बॅरक क्रमांक २ च्या जवळील हौदाजवळ घडला होता. गेल्या वर्षी आळंदी येथे दोन गटात झालेल्या भांडण प्रकरणात काही जणांना अटक केली होती. त्यानंतर आरोपींना न्यायालयीन कैदी किशोर विभागात ठेवण्यात आले. या विभागात इतरही न्यायालयीन कैदी आहेत. या आरोपींची इतर कैद्यांशी भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरुन त्यांनी कैद्यांनी मिळेल ते साहित्य हातात घेऊन हाणामारी केली.

वारंवार अशा घटना घडत असल्यामुळे येरवडा कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Share This News
error: Content is protected !!