सांगली- म्हैसाळ सामूहिक आत्महत्याप्रकरणी पोलिस तपासातून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. वनमोरे कुटुंबातील ९ जणांनी आत्महत्या केली नसून त्यांना विषारी औषध घालून मारल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका मांत्रिकाला त्याच्या साथीदारांसह गजाआड केले आहे. गुप्तधनाच्या हव्यासापायी या ९ जणांनी आपला जीव गमावल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील एकाच कुटुंबातील 9 जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याने संपूर्ण जिल्हा हादरला होता. पशुवैद्यकीय डॉक्टर असणारे माणिक वनमोरे व त्यांचे शिक्षक बंधू पोपट वनमोरे, या दोघांनी आपली आपल्या आई, पत्नी व मुलांच्या समवेत सामूहिक आत्महत्या केल्याचं म्हटलं जात होतं. दोन्ही कुटुंबांनी आपल्या घरामध्ये एकाच वेळी विष पिऊन आत्महत्या केली असावी, अशी अटकळ बांधली गेली. घटनास्थळाची परिस्थिती पाहिल्यानंतर अनेकांकडून अनेक प्रश्न देखील उपस्थित करण्यात येत होते.
नेमकी आत्महत्या कोणत्या कारणाने झाली, हा घातपात आहे, की नेमकी आत्महत्या की आणखी काय आहे? याबाबत अनेक तर्कवितर्क देखील व्यक्त करण्यात येत होते. वनमोरे बंधूंवर कोट्यवधी रुपयांचं कर्ज झाले होते. या कर्जाच्या वसुलीचा तगादा आणि सावकारीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचं बोललं जात होतं. मात्र त्या 9 जणांची आत्महत्या नसून हत्याकांड झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
गुप्तधनासाठी वनमोरे कुटुंबीयांनी मांत्रिक अब्बास उर्फ मोहम्मद अली बागवान याला एक कोटी रुपयांची रक्कम दिली होती. ही रक्कम अनेकजणांकडून कर्ज काढून, कुणाकडून पैसे घेऊन हे पैसे वनमोरे बंधूंनी जमवले होते. त्यानंतर जेव्हा आर्थिक अडचण भासू लागली, तेव्हा या पैशांची मागणी अब्बासकडे करण्यात आली. वनमोरे कुटुंब आपले एक कोटी रुपये परत मिळावेत म्हणून अब्बासकडे तगादा लावत होते.
एक दिवस अब्बास मांत्रिक आपल्या ड्रायव्हर धीरज सुरवसेला घेऊन वनमोरे कुटुंबाकडे आला. गुप्तधन शोधून देतो म्हणून त्यानं कुटुंबातील सगळ्यांना गच्चीत पाठवलं. गच्चीतून जेव्हा वनमोरे कुटुंबीय तुम्ही खाली घरात आले, तेव्हा अब्बासने वनमोरे कुटुंबाला चहा पाजला. या चहात त्यानं विष कालवलं होतं. एक एक करुन प्रत्येकजण चहा पिऊन बेशुद्ध पडला. चहातून विष देऊन मांत्रिक अब्बास आणि त्याचा ड्रायव्हर वनमोरेंच्या घरातून पळाले. पण त्याआधी त्यांनी ही हत्या वाटू नये, यासाठी सुसाईड नोट लिहिण्याचा कट रचला. हीच सुसाईड नोट आरोपीना पकडण्यात महत्वाची ठरली.
अख्खं कुटुंब बेशुद्ध पडल्यानंतर एक बोगस सुसाईड नोट या दोघांनी तयार केली. या नोटमधील मजकुराचा पोलिसांना संशय आला. सर्वसाधारणपणे सुसाईड नोटमध्ये आत्महत्येचं कारण अगोदर लिहिलं जातं आणि त्यानंतर जो कुणी आत्महत्येला जबाबदार असतो, त्यांची नावं लिहिलेली असतात. मात्र मांत्रिकाने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये सुरुवातीलाच आत्महत्येला जबाबदार कोण यांची नावं लिहिली गेली होती. मात्र आत्महत्येच्या कारणांचा कोणताच उल्लेख त्यात नव्हता. पॉलिसीची दिशाभूल करण्यासाठी सावकारांची नाव सुसाईड नोटमध्ये लिहिण्यात आली होती. मुख्य आरोपी आणि मांत्रिक असलेल्या मोहम्मद अली बागवान आणि त्याचा ड्रायव्हर धीरज सुरवसेने केला होता.