अभिनेत्री हृता दुर्गुळेच्या ‘अनन्या’ या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा सिनेमा २२ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. दरम्यान सिनेमाचा ट्रेलर पाहून चाहते हृताच्या प्रेमात पडले आहेत. सर्वच प्लॅटफॉर्म्सवरुन हृतावर कौतुकाचा वर्षाव होतोय. अशामध्ये तिचा नवरा प्रतीक शाह कसा मागे असेल ? त्याने सुद्धा हृताच्या कौतुकासाठी इन्स्टाग्रामवर स्टोरी आणि पोस्ट शेअर केली आहे.
काय म्हणाला प्रतीक ?
प्रतीक देखील अनन्याच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला उपस्थित होता. सर्वात आधी त्याने ‘This’आणि हार्ट इमोजी असं लिहून अनन्याचे पोस्टर शेअर केले आहे. त्यानंतर त्याने ट्रेलर लाँट सोहळ्यातील व्हिडिओ पोस्ट करत त्याचा बिग स्क्रीनचा अनुभव शेअर केलाय. प्रतीकने आणखी एक स्टोरी पोस्ट करत अनन्याच्या ट्रेलरची झलक शेअर केली आहे. त्यात त्याने असं म्हटलं आहे की, ‘लेडीज अँड जेंटलमन.. माझी बायको..’
‘अनन्या’च्या जिद्दीचा प्रवास
एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव निर्मित या चित्रपटात ‘तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे!’, असे म्हणणाऱ्या ‘अनन्या’च्या जिद्दीचा प्रवास पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून एका क्षणी मन सुन्न करणारा हा ट्रेलर क्षणार्धात मनाला जगण्याची नवी उमेद देणाराही आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रताप फड यांनी केले असून ‘अनन्या’ची व्यक्तिरेखा हृता दुर्गुळे साकारत आहे. तर ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया ‘अनन्या’चे निर्माते आहेत.
ट्रेलरमध्ये आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी धडपडणारी, आयुष्य दिलखुलास जगणारी ‘अनन्या’ दिसत आहे. एका अपघातात तिचे दोन्ही हात जातात. मात्र ‘अनन्या’ पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभी राहताना यात दिसत आहे. नावाप्रमाणेच इतरांपेक्षा वेगळ्या असणाऱ्या ‘अनन्या’चा एक प्रेरणादायी प्रवास यात दिसत असून ‘शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे!’ हा खूप मोलाचा सल्ला देणारा हा चित्रपट आहे.