मुंबई- अखेर भाजप नेते किरीट सोमय्या यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे. मात्र सोमवार (दि. 18)पासून सलग चार दिवस सकाळी 11 ते २ यावेळेत पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे.
किरीट सोमय्यांच्या या अर्जावर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. किरीट सोमय्या यांच्या अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने एक मोठा दिलासा दिला आहे. सुनावणीपर्यंत अटक करु नये असं कोर्टाने म्हटलं आहे. तसेच अटक झाल्यास ५० हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत.
किरीट सोमय्यांचे वकील अॅडवोकेट विवेकानंद गुप्ता यांनी सांगितले की, किरीट सोमय्या यांना दिलासा मिळाला आहे. 18 तारखेपासून चार दिवस पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर रहावे लागेल. प्राथमिकदृष्ट्या 57 कोटी रुपये गोळा केले याचे पुरावे दिसत नाहीत. 2013 मधील हे प्रकरण आहे मग 2022 मध्ये गुन्हा दाखल का झाला. या मुद्द्यांवर अंतरिम संरक्षण मिळाले असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. उद्यापासून सलग चार दिवस सुट्ट्या आहेत आणि त्यामुळे कोर्टाचे कामकाजही बंद असणार आहे. त्यामुळे आता किरीट सोमय्या यांच्यासाठी आजची सुनावणी खूपच महत्त्वाची होती.
काय आहे प्रकरण ?
किरीट सौमय्या यांनी आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी मोहीम राबवली होती. आयएनएस विक्रांत राज्यातच राहावी यासाठी किरीट सौमय्यांनी पैसे जमा केले होतो. यासाठी त्यांनी पैसे जमा केले होते. पण जमा केलेले पैसे राज्यपाल कार्यालयात पोहचले नाहीत, अशी माहिती आरटीआयमध्ये उघड झाली. आरटीआय कार्यकर्ते उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून मागवली माहिती होती. यात असे कोणतेही पैसै मिळाले नसल्याचं राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आले.
या प्रकरणी माजी सैनिक बबन भीमराव भोसले यांनी पोलिसांत तक्रार अर्ज दाखल केला. किरीट सोमय्या, नील सोमय्या आणि त्यांचे इतर साथीदार याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी प्रयत्न सुरु केले. किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर किरीट सोमय्या नॉट रिचेबल झाले होते. पोलीस ठाण्यात देखील चौकशीसाठी उपस्थित झाले नाहीत.
त्यामुळे किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्या दारावर आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीचे समन्स मंगळवारी चिकटवले होते. दोघा पिता-पुत्रांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी सकाळी 11 वाजता हजर होण्यास बजावले होते. या प्रकरणात किरीट सोमय्यांची बाजू मांडण्यासाठी त्यांचे वकील विवेकानंद गुप्ता हे पोलीस आयुक्त कार्यालयात गेले होते. गुन्हा दाखल झाल्यापासून किरीट सोमय्या नॉट रिचेबल आहेत असे म्हटले जात असतानाच याबद्दल बोलताना योग्य वेळी किरीट सोमय्या समोर येतील, असं त्यांचे वकील विवेकानंद गुप्ता यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते.