पुणे : सध्या पुणे शहरामध्ये पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच कसबा पेठ इथून एक मोठी बातमी समोर येते आहे. कसबा पेठ मध्ये भरारी पथक आणि वाहनांची तपासणी करून आतापर्यंत दहा लाख 53 हजार पाचशे रुपये जप्त करण्यात आले आहेत. अशी माहिती कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे देवकाते यांनी दिली आहे.
सविस्तर माहिती नुसार, कसबा पेठ मतदारसंघात नऊ तपासणी नाके, नऊ भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहेत. या पथकांमार्फत संपूर्ण मतदारसंघात वाहनांची तपासणी केली जात असून, आत्तापर्यंत दहा हजार पेक्षा अधिक वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. पोटनिवडणुकीत भरारी पथकामार्फत आणि नाका तपासणी मध्ये बारा हजार दोनशे पन्नास रुपये किमतीची दारू देखील जप्त करण्यात आली आहे.
कसबा पेठ पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि महाविकास आघाडी या दोन प्रमुख पक्षांमध्ये अटीतटीची लढत होणार आहे. दोन्हीही पक्षांचे दिग्गज नेते बैठका घेण्याबरोबरच प्रचारात देखील सहभागी होत आहेत. यासाठीच आचारसंहितेचे देखील पालन व्हावे यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. तसेच पथकामार्फत संपूर्ण प्रचार यंत्रणेचे व्हिडिओ शूटिंग देखील करण्यात येते आहे.