नाशिकच्या काळाराम मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास मज्जाव, संभाजीराजेंच्या पत्नीची खळबळजनक पोस्ट

521 0

नाशिकच्या काळाराम मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांनी मज्जाव केला असा आरोप छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगीताराजे यांनी केला आहे. या आरोपामुळे वाद निर्माण झाला आहे. याबाबत संयोगीताराजे छत्रपती यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर आपल्याला आलेल्या अनुभवाची माहिती देणारी पोस्ट लिहिली आहे.

सर्वत्र श्रीराम नवमी उत्साहात साजरा करण्यात आली. देशभरातील राम मंदिरांमध्ये भाविकांनी अलोट गर्दी केली होती. अनेक ठिकाणी शोभा यात्रा, प्रभात फेऱ्याही काढण्यात आल्या. मात्र, या उत्सवी वातावरणात संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांना वेगळ्याच अनुभवाला सामोरे जावे लागले. संयोगिताराजे छत्रपती यांनी हा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्या या पोस्टने एकच खळबळ उडाली आहे.

श्रीराम नवमीच्या निमित्ताने संयोगिताराजे छत्रपती यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरास भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिरात पूजा केली. महंतांनी पूजा पुराणेक्त पद्धतीने करण्यास सुरुवात केली. यास संयोगिताराजे छत्रपती यांनी विरोध दर्शवत वैदिक पद्धतीने मंत्र म्हणण्यास सांगितले. हा सगळा प्रकार संयोगिताराजे यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

काय म्हटलं आहे संयोगीताराजे यांनी पोस्टमध्ये?

हे श्रीरामा, स्वतःला सर्वज्ञ समजून, माणसा-माणसात भेद निर्माण करणार्‍या,परमेश्वराच्या नावाने केवळ स्वार्थ साधू पाहणार्‍यांना सद्बुद्धि दे… हीच आमची प्रार्थना,अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे..

आपण सर्वजण देवाची लेकरे..आणि लेकरांनी आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी कोणाची परवानगी कशाला हवी?या विचारानेच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अनेक क्रांतिकारक असे निर्णय घेतले होते. त्यांचा वैचारीक वारसा चालवण्याची जबाबदारी आणि त्यामुळे जे आत्मबल प्राप्त झाले त्यामुळेच परवा नाशिकमध्ये काळा राम मंदिरात महा मृत्युंजय मंत्राचा जप बिनदिक्कत करू शकले.

नाशिकच्या काळा राम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशामुळे मी ठामपणे विरोध केला.अनेक कारणे देऊन त्यांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही हे सांगायचा प्रयत्न केला.शेवटी मी विचारले की ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली! मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका. तरीही मी महामृत्युंजय मंत्र जप का केला म्हणुन त्यांनी प्रश्न केलाच… तेव्हा मात्र परमेश्वराच्या लेकराला, आपल्या ईश्वराला भेटायला आणि त्याची स्तुती करायला तुमच्या मध्यस्थीची गरजच नाही, असे सुनावले.

त्यानंतर मी तिथेच रामरक्षा पण म्हणली. या प्रसंगाने माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की शंभर वर्षात ही मानसिकता का बदलली नाही? अजूनही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलेल्या विचारांना खूप खोलवर रुजवावे लागणार आहे. अजूनही खूप प्रवास बाकी आहे…अजून खूप चालावे लागणार आहे. हे श्रीरामा, त्यासाठी बळ दे आणि सर्वांना ज्ञान दे!

आता या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चांना एकच उधाण आले आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide