पुणे : पुणे आणि परिसरात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडला. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. सुरु असलेली पुणे मेट्रोची कामे आणि त्यात झालेल्या पावसामुळे शहराच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. शहरभरात वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. यात पुणे मनपाचे शून्य नियोजन पाहायला मिळाले. शहरातील अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले. सोबतच छोटे-मोठे नालेही भरून वाहू लागले. अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे बावधन परिसरामध्ये हाहाकार उडाला होता.
राम नदी ही मागील काही वर्षात पहिल्यांदाच दुथडी भरून वाहिली. पावसामुळे या भागातील खोलगट भागांतील अनेक घरात पाणी शिरले. काही ठिकाणी तर पाच फूटापर्यंत पाणी साचले होते. पावसात चंदननगर पोलिस स्टेशन, वेदभवन, कोथरुड, वनाज जवळ कचरा डेपो, कोथरुड, लमाण तांडा-पाषाण, सोमेश्वर वाडी- पाषाण, वानवडी, शितल पेट्रोल पंप, बी टी ईवडे रोड, काञज उद्यान येथे मोठयाप्रमाणात पाणी साठलेले होते. या पार्श्वभूमीवर ना. डॉ. नीलम गोर्हे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन पाणी साठत असलेल्या ठिकाणी पंपिंग स्टेशन्स उभारून अंडरग्राऊंड टॅंक तयार करण्याची मागणी करीत आहे.
या निवेदनात त्यांनी पुढील मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे :
• पुण्यातील मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सोसायटीत तसेच वाहनांचे नुकसान झाले आहे. त्या खेरीज प्रत्येकाच्या घरामधली किंवा दुकानांमध्ये विविध साहित्याचे तसेच कागदपत्रांचे सुद्धा नुकसान झालेले आहे. मी सदरील पत्राच्या माध्यमातून शासनाकडे विनंती आहे की इन्शुरन्स मधून याचे नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भात आणि इन्शुरन्स कंपन्यांशी बोलावं जेणेकरून लोकांना दिलासा मिळेल. तसेच सानुग्रह अनुदानातून आर्थिक मदत देण्यात यावे.
• यापूर्वी पण अशीच नुकसान झालं त्याबद्दलचा काही पूर्वलक्षी किंवा पूर्वीच्या काळामधलं काही निर्णय असेल त्याचाही अभ्यास व्हावा. जेणेकरून प्रत्येक पावसामध्ये जे हजारो वाहनधारकांचे त्याचबरोबर खालच्या मजल्यावर पाणी घुसल्यामुळे जे नुकसान होत आहे. विशेषतः शहरी भागामध्ये त्याच्यावरती काही तोडगा निघू शकेल असं मला वाटतं आणि त्या दृष्टिकोनातून विभागीय आयुक्तांनी या संदर्भामध्ये काही भूमिका घ्यावी तसेच शासनाने धोरण ठरवण्यामध्ये लक्ष घालावे.
• पाऊस पडल्यानंतर शहरातील सर्व ट्रॅफिक सिग्नल बंद पडतात यासाठी पुणे मनपा आणि ट्रॅफिक विभागाना वेगळी यंत्रणा उभारण्यात यावी. ऊर्जा विभागानेही सिग्नल चा वीजपुरवठा कां खंडित झाला याच्याबद्दलचा एक अहवाल मला त्वरित सदर करावा. सदरील सखल भागात पावसाचे पाणी साचत असल्याने या ठिकाणी पम्पिंग स्टेशन उभारून अंडरग्राउंड टॅंक तयार करण्यात यावे.
• पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही वर्षांत वाहतूक कोंडी वाढत आहे. शहरात पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, मेट्रो, रेल्वे, एसटी, पुणे महानगर क्षेत्र प्राधिकरण (पीएमआरडीए) सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी), राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी), स्मार्ट सिटी, आरटीओ आदी विविध शासकीय विभागांचे वेगवेगळे प्रकल्प सुरू आहेत. त्यांच्यात समन्वय निर्माण करून शहराचा एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करण्याची जबाबदारी राज्य सरकारने “उमटा’कडे सोपविली होती या आराखड्याची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी.