महाराष्ट्र : तुम्ही जर यावर्षी दहावी किंवा बारावीची परीक्षा देणारे विद्यार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेला विद्यार्थ्यांना वेळेतच परीक्षा केंद्रात पोहोचणं आता बंधनकारक असणार आहे. अन्यथा उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश मिळणार नाही. उशिरा पोहोचण्याच्या सवलतीचा विद्यार्थी गैरफायदा घेत असल्याचे बोर्डाच्या निदर्शनास आल्यानंतर बोर्डाने हा मोठा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा यावर्षी 21 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान घेण्यात येत आहेत. सकाळच्या सत्रात अकरा वाजता ते दुपारी तीन वाजता अशी पेपरची वेळ असून, आत्तापर्यंत अपवादात्मक परिस्थितीत दहा मिनिटे उशीर झाला असला तरी विद्यार्थ्यांना पेपरला बसण्याची अनुमती दिली जात होती. परंतु यापुढे राज्य मंडळांनी उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश न देण्याचे आदेश केंद्राने दिले आहेत. या बाबत शिक्षण मंडळाने सर्व शाळांना पत्र देखील पाठवले आहे.