पुणे- ‘प्रवीण मसालेवाले’ या लोकप्रिय ब्रँडचे संस्थापक सुप्रसिद्ध उद्योजक हुकमीचंद सुखलाल चोरडिया (वय ९२) यांचं आज सकाळी वृद्धापकाळानं निधन झालं.
आज सायंकाळी साडेपाच वाजता पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनानं उद्योग जगतामध्ये शोक व्यक्त केला जात आहे.
हुकमीचंद चोरडिया यांनी १९६२ मध्ये प्रवीण मसाले या मसाल्याच्या कंपनीची स्थापना केली होती. मारवाडी कुटुंबातून आलेल्या चोरडिया यांनी महाराष्ट्रातील लोकांना त्यांच्या चवीने वेगवेगळे मसाले पुरवले आहेत. चोरडिया हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील. हुकमीचंद चोरडिया यांच्या पत्नी कमलाबाई यांनी मसाले बनवून विकण्याची कल्पना पुढं आणली. यातून मोठ्या उद्योगाची स्थापना झाली.
मसाले उद्योगात प्रवीण मसाले यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. प्रवीण मसालेवाले हा ब्रँड घरोघरी पोहोचवण्यासाठी हुकमीचंद चोरडियांनी 40-50 वर्ष अविरत कष्ट केले. वेगवेगळ्या प्रकारचे मसाले प्रवीण मसालेवाले समूहाकडून बनवले जातात. याला खास महाराष्ट्रीय तडका असतो. शाकाहारी, मांसाहारी जेवणासाठी लागणारे प्रत्येक प्रकारचे मसाले प्रवीण मसालेवाले समूहाकडून बनवले जातात.