पुणे : पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र नारायणपूर येथे दत्त जन्म व दत्तजयंती निमित्त मिरवणूक सोहळा साजरा होत असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सासवड ते कापूरहोळ रस्त्यावरील अवजड वाहतूक ४ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजेपासून ८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत पर्यायी रस्त्यावरुन वळविण्याचे आदेशीत केले आहे.
कापूरहोळ ते सासवड या मार्गावरील अवजड वाहने कापूरहोळ वरुन बंगळुरू- पुणे महामार्गावरील नवीन बोगद्यातून पुण्याकडे आणि सासवड ते कापूरहोळ या मार्गावरील अवजड वाहने सासवड वीर मार्गे सारोळा तसेच सासवड-दिवेघाट मार्ग कात्रज चौक अशी जातील.
श्रीक्षेत्र नारायणपूर येथे ५ ते ७ डिसेंबर २०२२ दरम्यान श्री दत्त सेवेकरी मंडळ यांचेवतीने दत्त जयंती सोहळा साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, तामिळनाडू, कनार्टक, राजस्थान या राज्यातूनदेखील भाविक दर्शनासाठी येत असतात. जवळच असलेल्या केतकावळे गावी असणारे बालाजी मंदीर या ठिकाणी देखील भाविक जात असतात. दोन्ही देवस्थानची ठिकाणे ही सासवड- कापूरहोळ या मार्गावर असून, यात्रा कालावधीत वाहतुकीचे नियमन व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यावरील अवजड वाहनांची वाहतुक वळविण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
 
                         
                                 
                             
                             
                             
                            