महाराष्ट्रात मुंबईसह या जिल्ह्यांना ४८ तासांत मुसळधार पावसाचा फटका बसण्याचा इशारा

748 0

राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. अशात आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून राज्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढचे २४ तास मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, दक्षिण कोकण आणि गोवा आणि पुढे पश्चिम किनारपट्टी, उत्तर कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील काही भागांवर मेघगर्जनेच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे

पुढचे ४८ तास राज्यासाठी महत्त्वाचे असून आज हलके गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज पश्चिम विदर्भात गारपीटची शक्यता वर्तवण्यात आली असून काही शहरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान राज्यात नांदेड, लातूर, उस्मानाबाद, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.

अकोला जिल्ह्यात शनिवार ८ एप्रिलपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच प्रतितास ३० ते ४० किमी वेगाने वादळीवारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी आपल्या शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी. शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावा. बाजार समितीतही विक्रीसाठी आणलेला माल सुरक्षित ठेवावा. मालाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी. विजा व गारांपासून बचाव करावा. सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने निर्गमित केल्या आहेत. या सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाचे नायब तहसीलदार एस.पी.ढवळे यांनी केले आहे.

Share This News
error: Content is protected !!