महाराष्ट्र : काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महापुरुषांच्या बाबत केलेल्या अवमानकारक वक्तव्यावरून राज्याचे वातावरण प्रचंड तापले होते. त्यानंतर भगसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये आले असताना त्यांच्याकडे राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचा उर्वरित काळ चिंतन मननामध्ये घालवण्याचा मानस पंतप्रधानांना कळविण्याची माहिती त्यांनी स्वतः दिली होती.
दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यपाल सिंह कोश्यारी यांना एक नोटीस बजावली असून कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांनी यांत्रिक अभियांत्रिकी क्षेत्रातील डॉक्टर प्रशांत कडू यांची अंतर्विद्यशाखीय शाखेच्या अधिष्ठाता पदी केलेली निवड वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे संकेत आहेत . विद्यापीठाच्या आधी सभा आणि व्यवस्थापन परिषदांमध्ये राज्यपालांकडून करण्यात आलेल्या सदस्यांच्या नियुक्त्या वादाच्या भौऱ्यात सापडल्या असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ पुन्हा एकदा नवीन नियुक्तीवरून वादात सापडले असल्याचे समजते आहे.
कुलगुरूंनी अपात्र व्यक्तीची नियुक्ती केल्याचा दावा करून माजी अधिसभा सदस्य एडवोकेट मनमोहन बाजपेयी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी थेट राज्यपाल आणि कुलपती भगतसिंह कोश्यारी ,कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी, कुलसचिव डॉक्टर राजू हिवसे आणि डॉक्टर प्रशांत कडू यांना प्रतिवादी केले असून, याच प्रकरणी याचिकेवरील युक्तिवाद झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यपालांसह सर्व प्रतिवादींना नोटीस बजावली आहे.