सातारा- साताऱ्यातील छत्रपती घराण्यावर टीका केल्याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना सातारा कोर्टाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरणी सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर सातारा पोलिसांनी गुरुवारी त्यांना ताब्यात घेतले. काल रात्री उशीरा पोलिसांनी त्यांना सातारा येथे आणले. त्यांना सकाळी ११ वाजता कडेकोट बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टात दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला.
तपास अधिकारी आणि सरकार पक्षाचे दोन वकील असे तिघेजण बोलले. सरकार पक्षाचा युक्तिवाद झाल्यानंतर बचाव पक्षाच्या वतीने सर्व मुद्दे खोडून काढण्यात आले आणि पोलिस कोठडीची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आले. दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर प्रथम न्यायदंडाधिकारी एस. ए. शेंडगे यांनी सदावर्ते यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.