मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला, संघटना सोडली, आपल्यासारखे आमदार सोडले पण ते शरद पवार यांना सोडायला तयार नाहीत, असे वक्तव्य बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी केले. आपण १०० टक्के शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने याठिकाणी पोहोचलो आहोत. मात्र या पदापर्यंत पोहोचण्यासाठी आपली किमान २० टक्के मेहनत आहे असेही गुलाबराव पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. एकूणच गुलाबराव पाटील यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले, ” आपल्यावर सध्या आपापल्या मतदारसंघात आरोप आणि टीका होत आहे. मात्र, त्याचवेळी काही लोक आपल्या पाठिशी उभेही राहत आहेत. आपण एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेऊन इकडे आलोय. आपल्यावर टीका करणाऱ्यांना आपला संघर्ष माहिती नाही. १९९२ च्या दंगलीत आम्ही तिघे भाऊ आणि आमचा बाप जेलमध्ये होतो. आपण उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेनेसाठी (Shivsena) खूप काही केले आहे”
संजय राऊत यांच्यावर टीका करताना गुलाबराव पाटील म्हणाले, ” आमच्या वाटचालीत पक्षाचा वाटा असला तरी आमचीही मेहनत आहे. ही मेहनत संजय राऊत यांना कळणार नाही. आम्ही काय आयत्या बिळावर नागोबा नाहीत. पक्षासाठी केस कशी अंगावर घेतात हे राऊत यांना माहीत नाही, ते मी भोगलेलं आहे. पक्षाच्या कार्यकर्ते आणि जनतेसाठी आम्ही सतत काम करत असतो. सभागृहात उद्या आम्हीच शिवसेनेच्या बाकीच्यांना प्रत्युत्तर द्यायला पुरेसे आहोत, असेही गुलाबराव म्हणाले.
“संजय राऊत यांना ३०२ काय असते, दंगलीच्यावेळी काय परिस्थिती असते, हे माहिती नाही. हे फक्त बाळासाहेबांचा फोटो लावून मोठे झालेले आहेत. आपण बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन प्रत्यक्षात काम केलेले कार्यकर्ते आहोत. संजय राऊत यांनी ४७ डिग्री तापमान असताना ३५ लग्नं लावून दाखवावती, मग मी त्यांना मानेन. रात्री १२ वाजता रक्ताची गरज पडते किंवा कार्यकर्त्यांना अडचणी येतात तेव्हा आमचा फोन सुरु असतो. त्यामुळे आपण परिस्थिती सांभाळून घेऊ. आपण एवढेच जण त्यांना सभागृहात पुरेसे आहोत” असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले.
‘संजय राऊत यांना चुना कसा लावतात हे माहित नाही. आता मी त्यांना ते दाखवून देईल’ असा टोला देखील गुलाबराव पाटील यांनी लगावला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला गुरुवारी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर आता शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना मुंबईला येण्याचे वेध लागले आहेत. आज दुपारपर्यंत हे आमदार गुवाहाटीहून गोव्याला पोहोचतील.