खासदार गिरीश बापट यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बापट यांना जाऊन २४ तास उलटत नाही तोच नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून गिरीश बापट यांचे जनसंपर्क कार्यालय आज नेहमीप्रमाणे उघडण्यात आल्याचं पाहायला मिळालं.
गिरीश बापट यांच्या पार्थिवावर पुण्याच्या वैकूंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्यातील मोठे नेते उपस्थित होते. बापट यांना शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला.
खासदार बापट हे लोकनेता म्हणून परिचित होते. नागरिकांची कामे करण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असत. बापट स्वत: कार्यालयात बसून लोकांच्या समस्या जाणून त्या सोडवायचे. बापट यांच्याकडे आपले गार्हाणे घेऊन गेले की आपले काम होणार अशी नागरिकांची भावना असायची. बापट दिल्लीत असले तरी त्यांचे कार्यालय नेहमीप्रमाणे सुरू असायचे. त्यांच्या ऑफिसातील कर्मचारी लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेत. आणि त्यावर मार्ग काढत. मोठ्या समस्या असतील तर बापट यांच्या सल्ल्याने त्याची सोडवणूक होत असे. बापट गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांचं कार्यालयात येणं कमी झालं होतं. पण त्यांचं कार्यालय बंद नव्हतं. जनसंपर्क कार्यालय सुरूच होतं. लोकांच्या समस्या जाणून घेतल्या जात होत्या. रुग्णालयातून तर कधी घरातून बापट आवश्यक त्या सूचना द्यायचे.
गिरीश बापट यांना जाऊन २४ तास उलटले असताना गिरीश बापट यांचं जनसंपर्क कार्यालय आज नेहमीप्रमाणे उघडण्यात आलं असून जनसंपर्क कार्यालयातील दैनंदिन कामे देखील नित्यनेमाने सुरु करण्यात आली आहेत.