‘महाराष्ट्राचा सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा हरपला’ मान्यवरांची श्रद्धांजली

636 0

पुण्याचे खासदार गिरीश बापट (वय ७२) यांचे निधन झाले. गिरीश बापट यांनी दीनानाथ रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गिरीश बापट यांच्या जाण्याने पुणे आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर शोककळा पसरली आहे. महाराष्ट्राचा सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा हरपला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार आदींनी बापट यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते चंद्रकांत पाटील, यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते पुण्याकडे रवाना झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी-

गिरीश बापट यांच्यासोबतचा एक जुना फोटो ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. आपल्या ट्विटमध्ये नरेंद्र मोदी म्हणाले, गिरीश बापट यांनी महाराष्ट्रात भाजपच्या उभारणीत आणि पक्ष मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आमदार असताना त्यांनी लोककल्याणाचे प्रश्न मांडले. प्रभावी मंत्री आणि नंतर पुण्याचे खासदार म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटवला.त्याचे चांगले कार्य अनेकांना प्रेरणा देत राहील.

देवेंद्र फडणवीस

पुण्याच्या जडणघडणीत बापटांचा मोठा वाटा होता. एक अजातशत्रू नेता हरपला. बापट यांनी केलेलं काम कधीच विसरू शकत नाही. सभागृहात दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्य राखण्याचं काम ते अतिशय चांगल्या रीतीने करत असत. दोन्ही बाजूंच्या आमदारांना गिरीश बापट आपलेसे वाटत असत. बापटांमध्ये माणसं जपण्याची कला होती. रस्त्यावरच्या माणसालाही आपला वाटेल असे ते माणूस होते. बापट यांना सगळ्याच क्षेत्रातले प्रचंड ज्ञान होते. बापटांचा हजरजबाबीपणा उल्लेखनीय होता. बापटांचे जाणे आमच्यासाठी धक्कादायक आहे

चंद्रकांत पाटील-

बापट यांच्या निधनाने पुण्याच्या राजकारणाचं, समाजकारणाचं, पुणे-महाराष्ट्र भाजपाचं हे फार मोठं नुकसान आहे. विरोधी पक्षांना सोबत घेऊन कसं काम करायचं यामध्ये त्यांचं कौशल्य होतं. एखादी समस्या कशी सोडवायची, याचं त्यांचं वेगळं कसब होतं. ते सर्वांचे मित्र होते. कुणाशीही शत्रुत्व नाही. हे सगळं एका माणसामध्ये आयुष्यभर मेहनत घेऊन निर्माण होतं अशी प्रकृती पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

शरद पवार-

पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत गिरीश बापट यांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केला. पुण्यातील लोकांच्या मनात पक्के स्थान निर्माण करत त्यांनी पुणेकरांच्या व कामगारांच्या प्रश्नांसाठी नेहमीच काम केले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एक सर्वपक्षीय जनसंपर्क जोपासणारे राजकीय नेते आपण गमावले आहेत. गिरीश बापट यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

अजित पवार-

राज्याचे माजी मंत्री, विद्यमान खासदार सन्माननीय गिरीश बापट यांचे निधन हे पुणे जिल्ह्यातल्या आम्हा सर्वपक्षीय राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. महाराष्ट्राचं सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून गिरीशभाऊंकडे पाह्यलं जायचं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या गिरीशभाऊंनी जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, पक्षभेदांच्या भिंती ओलांडून समाजकार्य, विकासाचं राजकारण केलं

विनायक राऊत-

महाराष्ट्राच्या विधानसभेत काम करत असताना गिरीश बापट मंत्री होते. योगायोगाने आम्ही संसदेत एकत्र काम करू लागलो. संसदेच्या एका कमिटीचे ते चेअरमन होते आणि मी सदस्य होतो. गेल्या ५ वर्षांत सातत्याने गिरीश बापट यांनी सर्व सहकारी सदस्यांशी सलोख्याचे संबंध ठेवले होते. अत्यंत मनमिळाऊ आणि लोकप्रिय नेता असं त्यांचं वर्णन करावं लागेल. मंत्रीपद मिळाल्यानंतरही कोणतीही मिजास न ठेवता त्यांनी खेळकर स्वभाव कायम ठेवला होता अशी भावना खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली.

अंकुश काकडे-

पुणे शहराच्या राजकारणात गेली ४० वर्षं अतिशय सक्रिय असलेले बापट माझे अतिशय जवळचे मित्र होते. गेल्या ३५ वर्षांपासून आम्ही राजकारणात एकत्र काम केलं.

रवींद्र धंगेकर-

गिरीश बापट यांनी काम करताना समविचारी सर्वांना सोबत घेऊन काम केलं. मागच्या आठवड्यात खासदार निधीतून कसबा गणपती मंदिरात भित्तीचित्र केलं आणि त्याच्या कार्यक्रमाला त्यांनी मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं. राजकीय स्तर कसा टिकवायचा हे गिरीश बापट साहेबांकडून शिकलं पाहिजे. त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकत मी विधानसभेत काम करेन. असे रवींद्र धंगेकर म्हणाले

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!