नवी मुंबई- भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर एका महिलेनं बलात्काराचे आरोप केले आहेत. त्यावरून नाईक यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानं नवी मुंबई पोलिसांकडून भाजप आमदार गणेश नाईकांचा शोध सुरु आहे. त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्यामुळे नाईक अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत आहेत का असे विचारले जात आहे.
गणेश नाईकांवर बलात्काराचे आरोप करणाऱ्या महिलेचे नाव दीपा चौहान असून त्यांनी यासंबंधित महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. याचीच दाखल घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गणेश नाईक यांना अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.
काय आहे प्रकरण?
याबाबत बोलताना दीपा चौहान म्हणाल्या की, गणेश नाईक यांच्या बरोबर आपले गेल्या 27 वर्षापासून लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये संबंध आहेत. या प्रेमसंबंधातून 15 वर्षाचा मुलगा झाला असून त्याला गणेश नाईक यांनी वडीलांचे नाव द्यावे, अशी मागणी दीपा चौहान यांनी केली आहे. गणेश नाईक यासाठी नकार देत असल्याने दीपा चौहान यांनी गणेश नाईकांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपासून आपली गणेश नाईक यांच्या बरोबर भेट झाली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर मुलाबरोबर सुरू असलेले बोलणे ही गणेश नाईक यांनी बंद केल्याचेही दीपा चौहान यांनी सांगितले.