गणेश मंडळाना प्रसाद वाटपसाठी करावे लागणार या नियमांचे पालन ; अन्न व औषध प्रशासन विभागाचे निर्देश

346 0

पुणे : गणेशोत्सव कालावधीत गणेश मंडळांनी प्रसाद तयार करताना आणि वाटताना स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत. गणेशोत्सवात गणपतीच्या आरतीनंतर प्रसाद वाटप होते. विषबाधेच्या संभाव्य घटना टाळण्यासाठी प्रसाद तयार करताना आणि वाटताना स्वच्छतेबाबत काळजी घेण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

वेळोवेळी प्रसादाच्या सेवनातून विषबाधा झाल्याच्या काही घटना यापूर्वी घडल्या आहेत. काही वेळा भाविकांनी तयार करून आणलेल्या प्रसादाचे वाटप केले जाते. या प्रसादाबद्दल कार्यकर्त्यांना कोणतीच कल्पना नसते. त्यामुळे गणेशोत्सवातील प्रसाद सुरक्षित असेल याकडे अन्न व औषध प्रशासनाचे लक्ष असणार आहे.

गणपती मंडळांनी स्वतः तयार केलेल्या प्रसादाचे वाटप करावे. प्रसादासाठी वापरला जाणारा शिधा व अन्न पदार्थांची गुणवत्ता तपासावी. प्रसाद करण्याच्या ठिकाणी स्वच्छता बाळगावी. तयार प्रसाद थंड करण्यासाठी स्वच्छ जागेचा वापर केल्यास प्रसाद दूषित होण्याची शक्यता कमी होते. प्रसादात शक्यतो कोरड्या पदार्थांचा समावेश करावा.

सणासुदीच्या दिवसात खवा, मावा, मिठाई, खाद्यतेल, वनस्पती इत्यादी अन्न पदार्थाना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने त्यामध्ये भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनातर्फे या अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या संबंधित आस्थापनांच्या तपासण्या व नमुने घेण्यासाठी विशेष मोहिम डिसेंबर २०२२ पर्यंत राबविण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त संजय नारागुडे यांनी दिली आहे.

Share This News
error: Content is protected !!