वन विभागात सहायक वनसंरक्षक (Forest Officer) हे पद अत्यंत महत्त्वाचे असून वने व वन्यजीव संरक्षण कामे प्रभावीपणे पार पडण्यासाठी तसेच गतिमान प्रशासन चालविण्यासाठी सदर पद फार महत्वाची भूमिका बजावत असते. नुकतेच 76 सहायक वनसंरक्षक यांना विभागीय वन अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आलेली असून, मागील 4 वर्षापासून विभागीय वन अधिकारी संवर्गातील पदसंख्या या पदोन्नतीने भरण्यात आली असल्याने सहायक वनसंरक्षक संवर्गातील बहुसंख्य पदे रिक्त झालेली आहेत. महाराष्ट्र शासन वन विभागाच्या आकृतीबंधानुसार सहायक वनसंरक्षक संवर्गाची एकूण 289 पदांची पदरचना मंजूर असून आजघडीला 200 हून अधिक (75%) सहायक वनसंरक्षक संवर्गातील पदे रिक्त असल्याने वन विभागात सध्या वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या कडे पदभार अतिरिक्त स्वरुपात सोपवून प्रशासन चालविण्यात येत आहे.
गट अ (कनिष्ठ) मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पदे
प्रादेशिक 118 39 79
वन्यजीव 56 09 47
सामाजिक वनीकरण 48 17 31
अकार्यकारी पदे 67 17 50
एकूण पदे 289 82 207
वन विभागाचे गतिमान प्रशासन चालविण्यासाठी व प्रभावी निर्णय घेण्यासाठी सहायक वनसंरक्षक संवर्गातील पदे पदोन्नतीने भरण्यासाठी पात्र वन परिक्षेत्र अधिकारी उपलब्ध असून सुद्धा मागील 3 वर्षापसून वन विभागाने सहायक वनसंरक्षक पदावर पदोन्नती करण्यासाठी विभागीय पदोन्नती समितीची बैठक आयोजित केलेली नसल्याने वन परिक्षेत्र अधिकारी संवर्गात वन विभागाच्या प्रशासनावर तीव्र नाराजी व असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. तसेच एकाच पदावर बऱ्याच वर्षापासून काम केल्याने व पदोन्नती साठी पात्र असून सुद्धा वन विभागात पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात येत नसल्याने आणि सध्या सुरु असलेल्या वन परिक्षेत्र अधिकारी संवर्गाच्या सेवाविषयक न्यायिक प्रकरणामध्ये शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग आणि विधी व न्याय विभाग यांचे कडून मार्गदर्शन घेऊन पदोन्नती प्रक्रिया पार पडणे शक्य असल्याने वन विभागाचे कर्तव्यदक्ष मंत्री मा. श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी विशेष लक्ष देऊन सहायक वनसंरक्षक पदावर पदोन्नती करण्यासाठी संबंधित अधिकारी संवर्गास सूचना द्याव्यात अशी मागणी वन परिक्षेत्र अधिकारी संवर्गाकडून होत आहे.