रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश कार्यकारीणीची 3 सप्टेंबरला निवडणूक ; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले राहणार उपस्थित

234 0

मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) या पक्षाची मुंबई प्रदेश अध्यक्ष आणि कार्यकारीणीची निवडणूक येत्या दि. 3 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता सांताक्रूझ पूर्व कालिना येथील भीम छाया सांस्कृतिक केंद्र येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकरिणीची निवडणूक नुकतीच पुण्यात संपन्न झाली असून राज्य अध्यक्षपदी सोलापुरातून राजा सरवदे यांची तर रिपाइं च्या राज्य सरचिटणीस पदी मुंबईतून गौतम सोनवणे यांची निवड झाली आहे. त्यामुळे रिपाइंचे मुंबई अध्यक्षपद सध्या रिक्त असून संपूर्ण मुंबई प्रदेश कार्यकारीणी ची निवडणूक येत्या दि.3 सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. रिपब्लिकन पक्षाच्या देश भरातील सर्व राज्य आणि जिल्हा कमिटी बरखास्त केल्याची घोषणा रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष ना.रामदास आठवले यांनी मागील महिन्यात केल्या नंतर नवीन कमिटी निवडण्यासाठी रिपाइं च्या पक्षातंर्गत निवडणुका सुरू आहेत.

महाराष्ट्र राज्य कमिटीची निवडणूक झाल्यानंतर राज्याची राजधानी असणाऱ्या आणि रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या मुंबईच्या कार्यकारीणी निवडणुकी कडे रिपब्लिकन कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशचे अध्यक्ष पद कुणाला मिळणार याकडे सर्व राज्यातील रिपाइं कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे दि. 3 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता भीमछाया सांस्कृतिक केंद्र येथे रिपाइं च्या मुंबई प्रदेश कार्यकरिणी निवडणूकीसाठी मुंबईतील सर्व वॉर्ड; तालुका आणि जिल्हा स्तरीय कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष पदाची धुरा रिपाइं च्या कोणत्या नेत्याच्या हाती जाते हा रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे. त्यामुळे दि.3 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता भीमछाया सांस्कृतिक केंद्र येथे रिपाइं कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित राहतील.

Share This News
error: Content is protected !!