घोषणा देतानाच अस्वस्थ वाटलं… युवासेना सचिव दुर्गा भोसले-शिंदे यांचे हार्टअटॅकने निधन

746 0

ठाणे शहरात आयोजित केलेल्या ठाकरे गटाच्या जनआक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेल्या युवासेना सचिव दुर्गा भोसले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अवघ्या वयाच्या ३० वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने ठाणे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रोशनी शिंदे या शिवसेना पदाधिकारी महिलेला मारहाण झाल्याच्या निषेधार्थ पोलीस आयुक्तालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला प्रचंड गर्दी झाली होती. शिवसेनेतील फुटीनंतरचा हा पहिलाच मोर्चा होता. त्यामुळे सर्वच शिवसैनिक या मोर्चाला एकवटले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी सुरु होती. ठाकरे गटाच्या युवासेनेच्या सचिव दुर्गाताई भोसले-शिंदे या सुद्धा मोर्चात जोरदार घोषणा देत सरकारचा निषेध करत होत्या. मोर्च्यात मोर्चेकऱ्यांसोबत त्या चालत होत्या.

घोषणा देत असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. छातीत दुखू लागल्याने त्यांना वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी तातडीने विश्रांती घेण्यास सागितले. तसेच त्यांना तात्काळ उपचारासाठी मुंबईला पाठवले. दुर्गाताई यांना लगेचच बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचारही सुरू करण्यात आले. उपचार सुरू असतानाच काल रात्री 1.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे निधन झाल्याचं समजल्यानंतर युवासेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सर्वांनाचा मोठा धक्का बसला आहे.

दुर्गाताई भोसले शिंदे यांच्या मागे पती, आई, वडील केशवराव भोसले आणि भाऊ असा परिवार आहे. आज सायंकाळी 5 वाजता धीरज अपार्टमेंट, पेडर रोड, जसलोक हॉस्पिटलच्या बाजूला, कंबाला हिल येथून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या पार्थिवावर वाळकेश्वर येथील बाणगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आदित्य ठाकरे त्यांचे ट्विट

दुर्गा भोसले-शिंदे यांच्या निधनावर आदित्य ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. ‘दुर्गा भोसले-शिंदे यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मन सुन्न झालंय. आमचा एक अत्यंत मेहनती आणि दयाळू युवासैनिक आम्ही आज गमावला आहे. युवासेना परिवाराला झालेला शोक व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. ओम शांती’ अशा आशयाचं ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

Share This News
error: Content is protected !!