ऑन ड्युटी नाईट…फुल टाईट ! मद्यधुंद पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा

1057 0

एक सहायक पोलीस निरीक्षक चक्क ऑन ड्युटी मद्यधुंद अवस्थेत आढळून आल्यामुळे पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे. हा प्रकार हिंगोली जिल्ह्यातील औंढा पोलीस ठाण्यात घडला आहे. दारूच्या नशेत असलेल्या या पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिरी असे या अधिकाऱ्याचे नाव असून, तो हिंगोली शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे. 9 एप्रिल रोजी त्यांची नाईट ड्युटी लागली होती. गस्तीवर असताना गिरी हे रात्री दोनच्या सुमारास रात्रगस्त चेकिंगसाठी औंढा पोलीस ठाण्यात पोहचले. मात्र पोलीस ठाण्यात जाताच त्यांची अवस्था पाहून ठाण्यातील पोलिसांना धक्काच बसला. त्यांनी एवढी दारू ढोसली होती की त्याला नीट उभं राहणं अवघड झाले होते.

गिरीला व्यवस्थितपणे चालता येत नव्हते. बोलताना अस्पष्ट बोलत होता. तोंडाला दारूचा वास येत असल्याने त्यांनी प्रचंड मद्यपान केल्याचे उपस्थित पोलिसांच्या लक्षात आले. औंढा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी यांनी सदरची बाब वरिष्ठांना कळवली. वरिष्ठांनी याबाबत कायदेशीर कारवाई करण्याची सूचना दिल्याने सुनील गिरी विरोधात औंढा पोलीस ठाण्यात कलम 85 (1) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कर्मचारी दिलीप किशनराव नाईक यांच्या फिर्यादिनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास पोलीस निरीक्षक झुंजारे करत आहेत. तर गुन्हा दाखल केल्यावर गिरीला नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!