Saurabh Tripathi

Saurabh Tripathi : वादग्रस्त पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठींची राज्य गुप्तवार्ता विभागात नियुक्ती

1429 0

मुंबई : खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने वादात अडकलेले आणि त्यानंतर अनेक महिने फरार असलेले पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी (Saurabh Tripathi) यांची राज्य गुप्तवार्ता पथकात नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना काही काळ सेवेतून निलंबित करण्यात आले होते. मात्र आता शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्रिपाठी यांना पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले.

सौरभ त्रिपाठी हे परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त असताना त्यांच्यासह तीन पोलिस अधिकाऱ्यांवर लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंगडियांकडून पैसे उकळल्याप्रकरणी इतर पोलिसांना अटक करण्यात आली; मात्र त्रिपाठी फरार होते. गुन्हे शाखेच्या पथकाने अनेक दिवस त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र ते पोलिसांच्या हाती लागले नव्हते. यानंतर त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले. तरीदेखील त्रिपाठी सापडत नसल्याने त्यांच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.

यानंतर अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी त्रिपाठी यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर ते चौकशीसाठी पोलिसांपुढे हजर झाले. चौकशीनंतर त्यांना जानेवारीमध्ये पुन्हा पोलीस सेवेत रुजू करून घेण्यात आले मात्र त्यांची नियुक्ती करण्यात आली नव्हती. अखेर राज्याच्या गृह विभागाने सोमवारी त्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले. त्यांची राज्य गुप्तवार्ता विभागात नियुक्ती करण्यात आली.

Share This News
error: Content is protected !!