सावधान ! कर्जासाठी कागदपत्रे जमा करताय ? तुमच्या खात्यातून रक्कम होईल गायब

524 0

कोणतेही कर्ज काढलेले नसताना जर कुणाच्या खात्यातून पैसे वजा होत असतील तर त्याला काय म्हणायचे ? पुण्यात असा प्रकार घडला आहे. हा प्रकार तुमच्याबाबतीत देखील घडू शकतो. म्हणून कर्ज प्रकरणासाठी कोणत्याही खासगी संस्थेत कागदपत्र जमा करताना सावधानता बाळगा.

कोथरूडमधील केळेवाडी येथे राहणाऱ्या शंकर सखाराम तोंडे व दीपाली रामदास येवले यांच्याबाबतीत असा प्रकार घडला आहे. त्यांच्या नावाने दुसऱ्यानेच कर्ज घेतल्याचे उघड झाले असून त्या कर्जाचे हफ्ते त्यांच्या खात्यामधून वजा होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी त्यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तोंडे यांच्या तक्रारीनुसार त्यांनी मुलीसाठी वीस हजार रुपयांचा मोबाईल हफ्ता पद्धतीने खरेदी केला होता. डिसेंबर २०२२ ला पगार झाल्यावर खात्यातून १०,२३७ रुपये वजा झाल्याचे दिसले म्हणून चौकशी केली तेव्हा आयडीएफसी बँकेत आपल्या नावावरून ८४,८९९ रुपयाचे कर्ज घेतल्याचे आढळले.

बँकेत विचारणा केली असता, तुम्ही ज्या दुकानात कागदपत्रे दिली होती, तेथे चौकशी करा असे सांगण्यात आले. तेथे चौकशी केली असता विक्री व्यवस्थापकाने प्रतीक्षा चौरे यांना फोन करण्यास सांगितले. मी चौरे यांना फोन केल्यावर त्यांनी सांगितले की, या गोष्टीचा गाजावाजा करू नका. माझ्याकडून हे चुकून झालेले आहे. मी तुमच्या बँकेत सर्व पैसे जमा करते. त्याप्रमाणे वजा झालेले पैसे परत जमा झाले. परंतु आता परत तोंडे यांच्या खात्यातून पैसे जाऊ लागले आहेत.

त्यामुळे कोणत्याही खासगी संस्थेकडून हप्त्यावर वस्तू घेताना किंवा कर्ज घेताना सावधानता बाळगण्याची गरज आहे.

Share This News
error: Content is protected !!