Crime

घरजावई चिडले, सासूचे दात पाडले, पुण्यातील घटना

737 0

घरजावयाबरोबर झालेल्या वादात जावयाने संतापाच्या भरात सासूचे दोन दात पाडले आणि सासूच्या तोंडावर गरम पाणी फेकल्याची घटना पुण्यात घडली. या प्रकरणी खडकी पोलिसांनी जावयाच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

महेंद्र सिद्धनाथ तोरणे (वय २५, रा. आर्मी क्वार्टर, सर्वत्र विहार कॉलनी, मुळा रोड) असे या घरजावयाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सासू खडकी येथील ॲम्युनेशन फॅक्टरीत नोकरीस आहेत. आरोपी महेंद्र हा त्यांचा जावई असून, त्यांची मुलगी आणि त्या असे तिघे आर्मी क्वार्टर सर्वत्र विहार, मुळा रोड समोर राहतात. सोमवारी सकाळी जावई आणि सासू यांच्यात वाद झाला. त्यावेळी त्यांनी जावयाला घरातून दुसरीकडे राहायला जाण्यास सांगितले.

त्यावरून दोघांमध्ये वादावादी झाली. घरजावई महेंद्र याने सासूचे केस धरून जमिनीवर डोके आपटल्याने त्यांचे दोन दात पडले. त्यानंतर सासूच्या तोंडावर गरम पाणी टाकल्याने सासूचा चेहरा भाजला आहे. त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिस उपनिरीक्षक बेंदगुडे तपास करीत आहेत.

Share This News
error: Content is protected !!