भर न्यायालयात आरोपीने थेट न्यायाधीशाच्या दिशेने….. मुंबईच्या कोर्टात घडली घटना

387 0

दोन गुन्ह्यांमध्ये सुरू असलेल्या खटल्याचा निकाल लवकर लागत नसल्याने संतापलेल्या आरोपीने न्यायाधीशांवर चप्पल फेकली. ही घटना शनिवारी कुर्ला येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात घडली.

आरोपी जावेद सुभाष शेख ऊर्फ प्रदीप सुभाष तायडे (४०) असे या आरोपीचे नाव आहे. मानखुर्दमध्ये राहणाऱ्या सुभाष याच्यावर ना. म. जोशी मार्ग आणि ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात सुभाषने पाच वर्षे शिक्षा भोगली, मात्र दुसऱ्या गुन्ह्यातील खटल्याच्या तारखा पडत असल्याने तो वैतागला होता.

१ एप्रिलला कुर्ला येथील महानगर दंडाधिकारी अ. अ. धुमकेकर यांच्या समोर उभे राहिल्यानंतर त्याने प्रलंबित खटल्याचा निकाल लागत नसल्याने नाराजी व्यक्त केली. वारंवारच्या फेऱ्यातून मुक्त करावे, अशी मागणी करीत त्याने न्यायालयात गोंधळ घातला. इतकेच नाही तर संतापाच्या भरात पायातील चप्पल काढून महानगर दंडाधिकाऱ्यांच्या दिशेने भिरकावली.

या प्रकारानंतर न्यायालयात असलेल्या पोलिसांनी सुभाषला ताब्यात घेतले. त्याच्यावर कुर्ला पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा, तसेच इतर वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Share This News
error: Content is protected !!