चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur) लोकसभेचे खासदार आणि काँग्रेस (Congress) नेते बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांना आतड्यात इन्फेक्शन झाल्याने नागपूरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी एअर ऍम्बुलन्सच्या (Air Ambulance) माध्यमातून दिल्लीतील वेदांता रुग्णालयात (Vedanta Hospital) दाखल करण्यात आले. आता बाळू धानोरकर यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती समोर आली आहे. मल्टी ऑर्गन फेल (Multi organ failure) असल्यामुळे त्यांना सध्या कृत्रिम श्वासावर ठेवण्यात आलं आहे.
वडिलांचं निधन
विशेष म्हणजे शनिवारी सायंकाळी बाळू धानोरकर यांच्या वडिलांचं निधन झाले होते. बाळू धानोरकर यांच्या वडिलांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी त्यांच्या मूळ गावी चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती येथे अत्यसंस्कार करण्यात आले. शनिवारी सायंकाळपासूनच धानोरकर यांना अस्वस्थ वाटत होतं. त्यामुळे त्यांना उपचारासाठी नागपूरच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांची प्रकृती आणखी बिघडल्यानं त्यांना विशेष एअर ॲम्बुलन्सने दिल्लीला हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर वेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कार्यकर्त्यांशी साधला संवाद
दरम्यान दिल्लीला जाण्यापूर्वी बाळू धानोरकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. माझी प्रकृती स्थिर असून, कार्यकर्त्यांनी घाबरून जाऊ नये, किंवा भयभीत होऊ नये. वैद्यकीय सल्ल्यानुसार पुढील काही दिवस तपासणी, उपचार आणि विश्रांती घेत असल्याचं’ धानोरकर यावेळी म्हणाले.