चाळीसगाव तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. गुरांना चारून घराकडे परत येणाऱ्या गुराख्याला आपल्या गुरांसहित प्राण गमवावे लागले. रेल्वेखाली सापडून गुराखी आणि सात जनावरांचा करुण अंत झाला. ही घटना चाळीसगाव तालुक्यातील शिदवाडी गावाजवळ घडली आहे.
राजेंद्र भीमराव सूर्यवंशी असं रेल्वेच्या धडकेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नावं आहे. धुळ्याहून चाळीसगावकडे मेमो ट्रेन निघाली होती. शिदवाडी गावाजवळ राजेंद्र सूर्यवंशी नेहमीप्रमाणे आपली गुरे चारून गावाकडे येत होते. मात्र समोरून येणाऱ्या रेल्वेचा अंदाज न आल्यामुळे राजेंद्र सूर्यवंशी यांच्यासह सात जनावरांचा जागीच मृत्यू झाला.
हा अपघात इतका भीषण होता की, अपघातानंतर काही जनावरे लांब फेकली गेली तर काही जनावरे रेल्वेखाली अडकली. मृत जनावरांमध्ये पाच गाई, एक म्हैस आणि एका वासराचा समावेश आहे.