पुणे : पुणे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांवर दारू पिऊन हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी भादवि कलम 323, 504, 506 यासह मुंबई दारूबंदी अधिनियमन कलम 85 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, उमेश मठपती नेमणूक फरासखाना पोलीस स्टेशन, अमित जाधव नेमणूक समर्थ वाहतूक विभाग आणि योगेश गायकवाड नेमणूक चंदननगर पोलीस स्टेशन यांनी 21 नोव्हेंबर रोजी रात्री दीडच्या सुमारास आप्पा बळवंत चौक रोडवरील कपिता मॅट्रिक्स बिल्डिंग येथील हॉटेल मेट्रो येथे गेल्यानंतर बार काउंटरवरून दारू मागवली. रात्री उशिरा हॉटेल बंद करून आवराआवरीचे काम सुरू असताना त्यांनी पुन्हा दारूची मागणी केली.
यावेळी दारूच्या नशेत त्यांनी रोहित काटकर या हॉटेल कर्मचाऱ्याला हाताने मारहाण करून शिवीगाळ केली असल्याची तक्रार फिर्यादीने केली आहे. धमकी देऊन या तीनही कर्मचाऱ्यांनी हॉटेलमधील बार काउंटरवर धिंगाणा केला. या घटनेची माहिती समजल्यानंतर मुंडवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे आणि पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे उपनिरीक्षक शिवाजी काटे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली असता या तीनही पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.