चिंचवड : अखेर निर्णय झाला आहे. भाजपने चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या उमेदवारीची माळ दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या गळ्यात घातली आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने चिंचवड विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून, येत्या 26 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
दरम्यान 2 फेब्रुवारी रोजी स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी उमेदवारी घोषित होण्यापूर्वी भाजपसाठी नामनिर्देश पत्र विकत घेतले होते. त्यामुळे एकीकडे चर्चेला उधाण आले असताना भाजपने आज त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला आहे.
स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्याच कुटुंबात उमेदवारी मिळण्याची शक्यता होतीच. दरम्यान यामध्ये त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि त्यांचे लहान बंधू शंकर जगताप या दोन नावांची चर्चा असताना आता भाजपने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.