बाजार समितीत महाविकास आघाडीचा गुलाल ! कुणाला किती जागा मिळाल्या ?

1735 0

राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समित्याच्या जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत आतापर्यंत 72 जागांचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये महाविकास आघाडीला सर्वाधिक 41 जागा मिळाल्या आहेत. तर भाजप-शिवसेना युतीला अत्यंत कमी 24 जागा मिळाल्या आहेत. मालेगाव बाजार समितीत मंत्री दादा भुसे गटाचा पराभव झाला तर भुसावळ बाजार समितीत एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसला आहे.

147 जागांपैकी 72 जागांचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात महाविकास आघाडीला सर्वाधिक 41 जागा मिळाल्या आहेत. तर भाजप आणि शिंदे गटाला फक्त 24 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे युतीसाठी हा मोठा धक्का असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राज्यातील जनतेचा कौल कुणाच्या दिशेने आहे हे स्पष्ट होत आहे.

महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी भाजप हा सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरला आहे. भाजपला आतापर्यंत 20 जागा मिळाल्या आहेत. तर शिंदे गटाला अवघ्या चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. राष्ट्रवादीला 17, काँग्रेसला 18 आणि ठाकरे गटाला अवघ्या सहा जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत इतरांना सात जागा मिळाल्या आहेत.

भुसावळ बाजार समितीत भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी १५ जागांवर विजय मिळवत बाजार समितीवर एक हाती सत्ता मिळवली. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या शेतकरी सहकार पॅनलला केवळ तीन जागांवर यश मिळालं आहे. हा निकाल महाविकास आघाडीचे नेते एकनाथ खडसे व माजी आमदार संतोष चौधरी यांना मोठा धक्का मानला जात आहे.

या निवडणुकीचे निकाल लागताच विजयी उमदेवाराच्या समर्थकांनी गुलाल उधळत आणि एकमेकांना पेढे भरवत एकच जल्लोष केला. यावेळी ढोल ताशांच्या तालावंर कार्यकर्त्यांनी ठेका धरला होता.

Share This News
error: Content is protected !!