औरंगाबाद- मशिदीवरील भोंग्यांना विरोध आणि हनुमान चालिसाचा मुद्दा उपस्थित करून आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंनी राज्यातील राजकीय वातावरण ढवळून काढलं आहे. आता राज ठाकरे यांच्या १ मे रोजी होणाऱ्या जाहीर सभेची राज्यभरात जोरदार चर्चा आहे. या बहुचर्चित सभेला पोलिसांनी काही दिवसांपूर्वी परवानगी दिली. मात्र ही परवानगी देताना पोलिसांनी तब्बल १६ अटीही ठेवल्या आहेत. या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे औरंगाबादला पोहोचले आहेत. पत्रकारांशी बोलताना त्यांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिले आहे.
औरंगाबादमधील ऐतिहासिक मराठवाडा सांस्कृतिक मैदानातून राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. या सभेला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सभेच्या नियोजनात कोणतीही काटकसर राहू नये, यासाठी स्वत: अमित ठाकरे हे आढावा घेण्यासाठी सभास्थळी पोहोचले. अमित ठाकरे यांनी आज सकाळीच मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाऊ मैदानाची पाहणी केली. स्टेज कुठे बांधण्यात येणार आणि कसा बांधला जाणार याची सर्व माहिती त्यांनी घेतली. तसेच काम करणाऱ्या कामगारांशी चर्चाही केली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या तयारीवर मी खूश आहे, असं पत्रकारांशी बोलताना अमित ठाकरे म्हणाले. सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी घालून दिलेली आवाजाची मर्यादा पाळणं शक्य होईल का ? या प्रश्नावर अमित ठाकरे म्हणाले की, १ मे रोजी होणारी सभा भव्य-दिव्य असेल आणि आम्ही अंगावर केसेस घ्यायला तयार आहोत.