पुणे- अजित पवार यांनी भाषणामध्ये टोलेबाजी करायला सुरुवात केली की भल्याभल्यांची भंबेरी उडते. पिंपरी चिंचवडमध्ये विकासकामांच्या उदघाटनासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशीच टोलेबाजी केली आणि सभागृहात हास्यकल्लोळ उडाला.
अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड शहरात विविध विकासकामांचं उद्घाटन पार पडलं. ‘पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय हॉकी प्रशिक्षण केंद्रा’चं उद्घाटन तसंच उद्योग सुविधा कक्ष व औद्योगिक सामाजिक उत्तरदायित्व कक्षाचं उद्घाटन दादांच्या हस्ते पार पडले. शहरातील पक्षाच्या पदवाटप आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना शहरात वाढवलेल्या CCTV च्या जाळ्याविषयी दादांनी मिश्किल टोलेबाजी केली.
दादा म्हणाले, ” रात्री कोण कुणासोबत कुठं फिरतंय, कसं फिरतंय, गार्डनमध्ये कोण गुलूगुलू करतंय, आता मला सगळं कळणार आहे. कारण पिंपरी चिंचवडमध्ये CCTV कॅमेरांचं जाळ उभारलं आहे. CCTV च्या माध्यमातून कुठल्या बहादराचं काय चाललंय, हे आता मला कळेल”, अशी मिश्किल टोलेबाजी अजित पवार यांनी केली.
‘तुम्ही कितीही टाळ्या वाजवल्या तरीही…’
आज पुण्यात कार्यकर्त्यांसमोर बोलताना देखील अजित पवार यांनी मजेदार वक्तव्य केले. अजित पवार म्हणाले, ” आता चुकायचं नाही बाबानो, लै खबरदारी घेतोय. मागं एकदा चुकलो होतो तर सकाळी ७ वाजल्यापासून यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर बसून राहिलो. म्हणून आता चुकायचा नाही” दादांच्या या वक्तव्यावर देखील कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवल्या. त्यावर अजित पवार म्हणाले, ” तुम्ही कितीही टाळ्या वाजवल्या तरीही मी काही बोलणार नाही. कार्यकर्त्यांनी कौतुक केले की नेते भावनेच्या भरात चुकीचे बोलून जातात. मी मात्र माझ्या दुसऱ्या मनाला सांगत असतो. चुकायचं नाही…चुकायचं नाही… चुकायचं नाही असं म्हणत असतो.