पुणे- आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. बागवे यांच्यासहित अभय छाजेड आणि रोहित टिळक यांनीही आपापल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेल्यांनी पदे रिक्त करण्याच्या राष्ट्रीय काँग्रेसने केलेल्या ठरावानुसार हे राजीनामे देण्यात आले आहेत.
त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला नवीन शहराध्यक्ष मिळणार आहे. राजस्थानमधील उदयपूर येथे नुकतेच काँग्रेसचे नवसंकल्प राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. या नवसंकल्प शिबिरामध्ये एक व्यक्ती एकच पद असा देखील एक ठराव पारित करण्यात आला. या ठरावामुळे रमेश बागवे यांनी राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे.
बागवे यांंच्याकडे प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी असून ते सहा वर्षे शहराध्यक्षपदावर आहेत. आता पक्षाच्या नवीन धोरणानुसार शहराध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दिला असल्याचे बागवे यांनी सांगितले. तर अॅड. छाजेड आणि टिळक हे सहा वर्षे प्रदेश सरचिटणीस होते, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात आले.