नाशिक : शिवसेना महिला आघाडी आणि युवासेना आयोजित बये दार उघड मोहिमेस नाशिक जिल्ह्यातून होणार सुरुवात होत आहे. या निमित्ताने या मोहिमेचा शुभारंभ करण्यासाठी विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे मंगळवार दिनांक २७ सप्टेंबर पासून महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांना भेटी देणार आहेत.
शिवसेना महिला आघाडीच्या या मंगलमय दौऱ्याची सुरुवात नाशिक जिल्ह्यातून होत आहे. दिनांक २७ रोजी सकाळी नाशिक शासकीय विश्रामगृहावर दुपारी १२.३० वाजता शिवसेना कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. यानंतर त्याच ठिकाणी दुपारी १.०० वाजता पत्रकारांशी संवाद साधतील.
त्यानंतर दुपारी ३.३० वाजता चांदवडमध्ये रेणुका मातेचे दर्शन घेऊन त्या नाशिकला येणार आहेत. दिनांक २८ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता नाशिकहून सप्तशृंगी देवीच्या दर्शनास जाणार आहेत. सकाळी ११.३० वाजता देवीचे दर्शन घेऊन नाशिकमार्गे पुण्याकडे रवाना होतील.
यानंतर त्या कोल्हापूर श्री अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी आणि माहूर येथील श्री रेणुकामाता दर्शन घेतील. या ठिकाणाहून प्रज्वलित झालेली ज्योत आणि प्रसाद दिनांक ५ ऑक्टोबर रोजी शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेस आणण्यात येणार आहे.
या दरम्यान बीड जिल्ह्यातील सामाजिक प्रश्नांवर बैठक घेणार आहेत. याचबरोबर प्रत्येक ठिकाणी शिवसेना पदाधिकारी आणि महिला आघाडी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. पत्रकार परिषद आणि शासकीय अधिकारी यांच्याशीही संवाद साधणार आहेत. ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यातील जनतेला नवरात्रीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.