मुंबई- युक्रेन रशिया या दोन देशांमधील युद्धामुळे कोसळलेल्या शेअर बाजाराने पुन्हा एकदा उभारी घेतली आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीचे कल हाती येऊ लागल्याबरोबर सेन्सेक्स 1000 तर निफ्टी 321 अंकांनी वधारला. जागतिक बाजारपेठांमध्ये देखील तेजी पाहायला मिळत आहे.
बीएससी सेन्सेक्स 1100 अंकांनी वाढून 55,800 वर पोहोचला आहे, तर निफ्टी निर्देशांक 500 अंकांनी वाढून 16757 वर पोहोचला आहे. अॅक्सिस बँक , स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह, एशियन पेंट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, बजाज फायनान्स या कंपन्यांचे शेअर्स वधारलेले पाहायला मिळत आहेत.
निफ्टी मेटल वगळता, सर्व निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक सकारात्मक क्षेत्रामध्ये व्यवहार करत होते. बँक निफ्टीच्या नेतृत्वात 3.6 टक्क्यांनी वाढ झाली. निफ्टी ऑटो 3.15 टक्क्यांनी, निफ्टी एफएमसीजी दोन टक्क्यांनी आणि निफ्टी आयटी निर्देशांक अर्धा टक्क्यांनी वाढला. कच्च्या तेलाचे भाव 111 डॉलर्सवर आल्याने जागतिक बाजारात उत्साह कायम आहे.