छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर रोषणाई; स्वातंत्र्य सेनानींनी दाखवला पंजाब मेलला हिरवा कंदील

204 0

मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित विविध उपक्रमांच्या माध्यमातून मध्य रेल्वेने 18.7.2022 रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आयकॉनिक सप्ताहाची दिमाखदार सुरुवात केली. ‘आझादी की रेलगाडी और स्टेशन्स’ या कार्यक्रमाने हा सप्ताह सुरु करण्यात आला.

स्वातंत्र्यसेनानी अनंत लक्ष्मण गुरव, मोतीलाल शंकर घोंगडे आणि अन्य 7 स्वातंत्र्यसेनानींचे परिवार या साऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्र. 18 वरून ऐतिहासिक अशा पंजाब मेलला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी आणि मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल उपस्थित होते. या सोहळ्यात या दोन्ही स्वातंत्र्यसेनानींसह अन्य 7 स्वातंत्र्यसेनानींच्या कुटुंबांचा सत्कार करण्यात आला.

Mumbai: Railways showcases iconic stations, events to mark 75 yrs of freedom

यावेळी महाव्यवस्थापक लाहोटी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “स्वातंत्र्यचळवळीत रेल्वेने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. ‘आझादी की रेलगाडी और स्टेशन्स’ या कार्यक्रमासाठी- मध्य रेल्वेची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, पुणे,सातारा आणि नाशिक रोड ही स्थानके आणि पंजाब मेल व हुतात्मा एक्स्प्रेस या मध्य रेल्वेच्या गाड्या यांची निवड झाली, ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. भारतीय उपखंडातील पहिली गाडी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून धावल्याने तसेच स्वातंत्र्य आंदोलनाच्या महत्त्वाच्या केंद्रबिंदूंमध्ये मुंबईचा समावेश असल्याने या स्थानकाचे ऐतिहासिक महत्त्व मोठे आहे. सर्वाधिक प्रतिष्ठित आणि सर्वात जुन्या गाड्यांपैकी एक असणाऱ्या पंजाब मेलला आज हिरवा कंदील दाखवला गेला, हीदेखील मध्य रेल्वेसाठी अभिमानाची बाब आहे.

हा कार्यक्रम साजरा करण्याच्या दृष्टीने गाड्या सजवून हिरवा कंदील दाखविण्यासाठी भारतीय रेल्वेच्या 27 गाड्यांची निवड झाली. मध्य रेल्वेच्या सर्वाधिक प्रतिष्ठित आणि सर्वात जुन्या गाड्यांमध्ये गणना होणाऱ्या पंजाब मेलचा त्यात समावेश आहे. पंजाब मेल या गाडीने 1 जून 1912 या दिवशी बॅलार्ड पीअर मोल स्थानकातून तिचा पहिला प्रवास सुरु केला आणि नुकतीच तिच्या सेवेला 110 वर्षे पूर्ण झाली.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या सूचीमध्ये समाविष्ट असलेले रेल्वेस्थानक असून, मुंबई शहराचा एक मानबिंदू आहे. तसेच मध्य रेल्वेचे ते मुख्यालयही आहे. भारतातील सर्वाधिक छायाचित्रित वास्तू ठरलेले हे स्थानक अमृतमहोत्सवानिमित्त निवडल्या गेलेल्या 75 रेल्वेस्थानकांपैकी एक आहे. आजचा ऐतिहासिक क्षण साजरा करण्याचा प्रसंग अविस्मरणीय करण्यासाठी हे स्थानक दिव्यांच्या विशेष रोषणाईने उजळले होते.

‘आझादी की रेलगाडी और स्टेशन्स’ या कार्यक्रमादरम्यान मध्य रेल्वेच्या कलाकारांनी पथनाट्य सादर केले तसेच मध्य रेल्वेच्या रेल्वे पोलीस दलाच्या बॅण्डपथकाने देशभक्तीपर गीतेही सादर केली. प्रधान विभागप्रमुख, मुख्यालयातील तसेच मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!