पुणे- मोटारीत बेकायदा गर्भलिंग निदान केंद्र चालविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इंदापूर पोलीस आणि वैद्यकीय विभागाने या मोटारीचा पाठलाग करून या बेकायदा केंद्राचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तिघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवीण पोपटराव देशमुख ( वय 32), तौसिफ अहमद शेख ( वय 20, दोघे रा. राजळे, सातारा ) तसेच एका व्यक्तीच्या विरोधात इंदापूर पोलिसांनी गर्भधारण पूर्व प्रसवपूर्व निदान तंत्र ( लिंग निवडीस प्रतिबंध ) 1994 सुधारित 2003 कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटारीत बेकायदा गर्भलिंग निदान केंद्र चालविले जात असल्याची माहिती इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष खामकर यांना मिळाली. त्यानंतर डॉ. खामकर, डॉ एकनाथ चंदनशिवे, डॉ. श्रीकृष्ण खरमाटे, डॉ . अमोल खनावरे यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली.
त्यानंतर वैद्यकीय पथक आणि पोलिसांनी या मोटारीचा पाठलाग सुरु केला. इंदापुर-अकलूज रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या दांपत्याने या मोटारीत प्रवेश केला. त्यानंतर मोटार भरधाव वेगाने निघाली. भांडगाव परिसरात एका ओढयाजवळ मोटार थांबली असता पोलीस आणि वैद्यकीय पथकाने त्वरित कारवाई करत मोटारीची तपासणी केली. या मोटारीत बेकायदा गर्भलिंग निदान केंद्र चालविले जात असल्याचे आढळून आले. त्यानंतर मोटारचालक तौसिफ़ शेख, प्रवीण देशमुख तसेच पत्नीची गर्भलिंग निदान चाचणी करण्यासाठी आलेल्या एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त अधीक्षक मिलिंद मोहिते उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलिसांच्या पथकाने केली.