शैक्षणिक गुणवत्ता वाढीसोबतच सर्वांगीण विकास उपक्रम ; विद्यार्थ्यांना योगासनाचे प्रशिक्षण

310 0

आता ऑफलाईन शाळा सुरू झाल्या आहेत. पुन्हा एकदा शाळांमध्ये विविध उपक्रम पुन्हा रंगू लागले आहेत. काल माध्यमिक विद्यालय, काशिग येथे दुबई येथील योगाशिक्षिका आणि आहारतज्ज्ञ अदिती केळकर हाटे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना प्राणायाम व योगाविषयक मार्गदर्शन केले. पुणे येथील वोपा या सामाजिक संस्थेच्या व्ही – स्कुल या मोफत शैक्षणिक ऍपवर योगाविषयक कोर्स सुरू झाला आहे. त्याचे औपचारीक उदघाटन करण्यासाठी त्या शाळेत आल्या होत्या. तालुक्यातील सामाजिक कामांसाठी कायम पुढाकार घेणारे युनिक पाथस कृषि पर्यटन केंद्राचे संचालक दत्ता शेळके यांच्या माध्यमातून या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

योगासने आणि प्राणायामामुळे विद्यार्थ्यांना मन एकाग्र ठेवण्यासाठी कसा फायदा होऊ शकतो, योगासनांचे फायदे काय हे थोडक्यात सांगून केळकर यांनी विद्यार्थ्यांसोबत प्रात्यक्षिके केली. अदिती केळकर हाटे या मूळ मुंबईच्या असून त्या दुबई येथे विद्यार्थ्यांसाठी व मोठ्यांसाठीही योगाचे वर्ग घेतात. आपल्याला जे येते त्याचा उपयोग समाजातील विविध स्तरातील लोकांना व्हावा, या विचारातून त्यांनी यापूर्वीही शालेय विद्यार्थ्यांसाठी, आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी मोफत योगावर्ग घेतले होते. यावेळी पहिल्यांदाच त्यांनी प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन अशा प्रकारचा वर्ग घेतला आहे. जिथे त्या पोहचू शकत नाही तिथेही योगा पोहचावा यासाठी त्या ऑनलाईन स्वरूपात व्ही – स्कुलवर ‘हसत खेळत योगा’ हा कोर्स घेत आहेत. ते महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांसाठी ऍपवर मोफत उपलब्ध असणार आहेत.

वॉवेल्स ऑफ द पीपल असोसिएशन, म्हणजेच वोपा या पुणे येथील संस्थेतर्फे केळकर या आल्या होत्या. वोपा ही संस्था विद्यार्थ्यांना मोफत व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी व्ही – स्कुल या ऍपद्वारे डिजिटल शिक्षण महाराष्ट्रभर पोहचवत आहे. जळगाव, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, पुणे या जिल्हा परिषदांच्या शिक्षण विभागासोबत मिळून त्यांनी डिजिटल शैक्षणिक साहित्य निर्मिती केली आहे. वोपाने आत्तापर्यंत २००० हुन अधिक शिक्षकांचे प्रशिक्षण घेतले असून त्यांनी तयार केलेले १ली ते १०वीचे मराठी, सेमी व उर्दू माध्यमाचे पाठ व्ही स्कुलवर उपलब्ध आहे. व्ही – स्कुलवरील शैक्षणिक साहित्य वापरून आत्तापर्यंत १२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे. आता व्ही स्कूलवर आदिवासी भाषांमधील अभ्यास साहित्य तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवे डिजिटल उपक्रम सुरू करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केळकर यांचा योगा विषयक कोर्स सुरू करण्यात आला आहे.

शाळेच्या वतीने गायकवाड सर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. शाळेतील मुख्याध्यापक – जवरे सर, गायकवाड सर, जाधव सर, भामरे सर, भोसले मॅडम या शिक्षकांनी हा कार्यक्रम पार पडावा यासाठी सहकार्य केले.

Share This News
error: Content is protected !!