पुणे: अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मुंबई-बेंगलोर हाइवे, सुस खिंड, महिंद्रा शोरूम समोर दोन मालवाहू ट्रकचा अपघात झाला असून त्यामधे दोन व्यक्ती जखमी अवस्थेत अडकल्या आहेत. त्याचवेळी तातडीने पाषाण अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले.
घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले असता, रस्त्यावर कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मुंबईकडून साताराकडे जाणारया मार्गावर मागील बाजूने दुसरया ट्रकने धडक दिल्याने अपघात होऊन वाहनचालक व सोबत असलेला कर्मचारी यांचे दोन्ही पाय पुढे अडकल्याने ते जखमी अवस्थेत होते. त्याचवेळी दलाच्या जवानांनी तत्परतेने अग्निशमन बचाव साहित्याचा (बोल्ड कटर, स्पेडर, डोअर ब्रेकर, कटावणी,रश्शी इत्यादी) वापर करुन सुमारे वीस मिनिटात दोन ही जखमींना बाहेर काढून तातडीने दोन रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात रवाना केले. जखमींच्या पायाला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली असून दत्तू आंबू गोळे, वय ६० व सुरज सुर्वे, वय ३० अशी यांची नावे असून हे सातारा भागातील रहिवाशी असल्याचे समजते.
या कामगिरीत अग्निशमन अधिकारी शिवाजी मेमाणे, वाहनचालक लतेश चौधरी व तांडेल विष्णू राऊत आणि जवान ज्ञानदेव गोडे, अब्दुल पटेल, सुरेश इष्टे तसेच मदतनीस जवान औंकार देशमुख, विकास कुटे यांनी सहभाग घेतला.