गृहिणींसमोर दिवसभरामध्ये अशा अनेक समस्या उभ्या राहतात , ज्या सामान्यतः खूपच हलक्या स्वरूपाच्या वाटतात पण विचार करा तुम्ही ऑफिसला निघाले आहात आणि तुमच्या आवडत्या एखाद्या शर्टावर शाईचा घट्ट डाग पडलेला आहे. पॅन्टवर धुळीने थर साचला आहे . तर तुम्हाला कसे वाटेल. पण आपल्या घरातील आई पत्नी नेहमीच कपडे साफ ठेवण्यासाठी झटत असते. त्यामुळे खरंतर हा विषय तेवढाही हलक्यात घेऊ नका.
सामान्यपणे चिकटपणा , धूळ रोजच्या वापरातले कपडे खराब झाले की ते अगदी सहज धुतले जातात . पण जेव्हा शाईचा डाग ,रक्ताचे डाग ,चॉकलेटचे डाग चिखलाचे डाग ,अन्नपदार्थ खाताना पडलेले डाग हे इतके चिकट असतात की ते सहजासहजी निघत नाहीत . मग अशावेळी काही घरगुती उपाय आहेत , ज्याच्या मदतीने तुमचे आवडते कपडे तुम्हाला फेकण्याची आवश्यकता पडणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात या डागांना घालवण्यासाठी काय उपाय आहेत .
रक्ताचे डाग : महिलांना पाळीच्या दिवसांमध्ये किंवा कोणत्याही कारणाने रक्तस्त्राव झाला तर कपड्यांवर पडणारे रक्ताचे डाग हे देखील अत्यंत चिवट असतात . अशावेळी ज्या भागावर डाग पडले आहेत तो भाग दुधामध्ये भिजवून ठेवा किंवा पाण्यात दोन चमचे मीठ घालून या पाण्यामध्ये डाग भिजून राहील असा कपडा ठेवा. आणि त्यानंतर तो कपडा स्वच्छ धुऊन घ्या . त्यामुळे कपड्यावरील रक्ताचे डाग हमखास निघून जातात .
चिखलाचे डाग : पावसाळ्यामध्ये कपड्यांवर चिखलाचे डाग लागणे सामान्य गोष्ट आहे . फॉर्मल शर्ट आणि पॅन्टसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. कारण पॅन्टच्या बॉटमला आणि शर्टच्या कॉलरला नेहमीच मळ साचतो . यासाठी कपडे भिजत घालताना त्यामध्ये विनेगर घालून भिजवा . त्यामुळे हे डाग सहज निघून जातील. त्यानंतर कपडे साध्या डिटर्जंटनी धुवून साफ करा . जर चिखलाचा डाग घट्ट असेल तर अशावेळी कच्च्या बटाट्याची पेस्ट करून चिखलाचे डाग पडलेल्या ठिकाणी लावा . यासाठी तो कपडा आधी स्वच्छ धुऊन घ्या , आणि त्यानंतर बटाट्याचा लेप लावा.
शाईचा डाग : बऱ्याच वेळा शर्टाच्या खिशामध्ये पेन ठेवला जातो आणि तो जर लीक झाला तर तिथे शाईचा डाग पडतो . हा शाईचा डाग काढणं सोपं नाही. यासाठी उपाय मात्र सोपा आहे. हा उपाय आहे लिंबू आणि मीठ… शाईच्या डागावर लिंबू अर्धे चिरून त्यावर मीठ टाका आणि त्याने हा कपडा जिथे डाग लागला आहे तिथे घासून काढा. त्यानंतर साध्या डिटर्जंटने हा कपडा धुवून काढा. त्याचबरोबर नेलपेंट रिमूव्हरने देखील हा शाईचा डाग सहज निघतो.
अन्नपदार्थ खाताना पडलेले हळदीचे डाग : सर्वात चिकट डाग म्हणजे हळदीचा डाग… यासाठी डाग असणाऱ्या भागावर व्हिनेगर किंवा लिंबू लावा आणि नंतर कपडे धुण्याच्या साबणाने स्वच्छ धुऊन घ्या. हा कपडा कडक उन्हामध्ये उलटा करून वाळत घाला. जेणेकरून त्या कपड्याचा रंगही जाणार नाही, मात्र हा हळदीचा डाग नक्की उडून जाईल. तसेच मिठाच्या थंड पाण्यामध्ये हा कपडा भिजवून ठेवला आणि त्यानंतर स्वच्छ धुतला तरीही डाग सहज निघून जाईल.
तेल किंवा तुपचे पडलेले डाग : तेल किंवा तुपाच्या पडलेल्या डागांसाठी पावडरचा वापर करून पाहिला आहे का ? नक्की तुम्हाला नवल वाटेल , पण तेलाचा किंवा तुपाचा डाग पडलेल्या कपड्यावर त्या भागात टाल्कम पावडर चोळून हा कपडा दुसऱ्या दिवशी स्वच्छ धुऊन घ्या नक्की फरक दिसेल.