वाईन विक्रीच्या विरोधात अण्णा हजारे यांचे 14 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण

288 0

राळेगणसिद्धी- राज्य सरकारने किराणा दुकान आणि सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीसंबंधी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. येत्या 14 फेब्रुवारी रोजी राळेगणसिद्धी येथील श्री संत यादवबाबा मंदिरात बेमुदत उपोषण करणार असल्याचे जाहीर केले आहे.

याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले असून या पत्रात त्यांनी म्हटलंय की, सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमधून वाईन विक्री सुरू करणे महाराष्ट्रासाठी अतिशय दुर्दैवी असून केवळ राज्याचा वाढणारा महसूल आणि वाईन उत्पादक आणि विक्रेते यांचे हित पाहून हा निर्णय घेतल्याचे दिसून येते. या निर्णयामुळे लहान मुले, तरुण व्यसनाधीन होऊ शकतो, महिलांना त्रास होऊ शकतो याचा विचार सरकारने केलेला दिसत नाही,

वाईन ही दारू नाही असा दुर्दैवी युक्तिवाद सरकारकडून करण्यात येत आहे याबद्दल अण्णा हजारे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. गेल्या काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातून वाईन विक्रीच्या निर्णयाला कडाडून विरोध होत आहे. राज्यातील 36 जिल्ह्यात भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे संघटन आहे. त्या सर्व कार्यकर्त्यांनी आपणाकडे निवेदन पाठवून जाहीर विरोध दर्शविलेला आहे. तसेच राज्यातील विविध बिगर राजकीय, सामाजिक संघटना आमच्याकडे येत आहेत. चर्चा करीत आहेत. या सर्वांची या निर्णयाविरोधात राज्यभर आंदोलन करण्याची तयारी आहे. तरीही सरकारला जाग येत नसेल तर आंदोलनाशिवाय पर्याय दिसत नाही.असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

सरकारने हा निर्णय तात्काळ रद्द करावा अशी जनतेची मागणी आहे. अन्यथा मी 14 फेब्रुवारी पासून राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचे अण्णा हजारे यांनी पत्रात म्हटले आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide