नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या भारतात वर्ल्डकप (World Cup 2023) सुरु आहे. यामध्ये टीम इंडिया चांगली कामगिरी करताना दिसत आहे. टीम इंडिया या वर्ल्डकपमध्ये अजूनही अपराजित आहे. त्यांनी आपले सुरुवातीचे पाचही सामने जिंकले आहेत. भारतीय संघ फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात चांगली कामगिरी करत असल्याचा फायदा संघाला होत आहे. फलंदाजीबद्दल बोलायचं गेल्यास भारतीय कर्णधार आणि आघाडीचा फलंदाज रोहित शर्माच्या तडाखेबंज फलंदाजीने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. रविवारी न्यूझीलंड संघाविरोधातील सामन्यातही रोहित शर्माने तुफान फटकेबाजी करत एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय आणि जगातील तिसरा फलंदाज ठरला आहे.
काय आहे तो रेकॉर्ड?
एकदिवसीय क्रिकेटमध्ये कॅलेंडर वर्षात 50 किंवा त्यापेक्षा जास्त षटकार ठोकणार रोहित शर्मा हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर आहे. रोहित शर्माच्या आधी दक्षिण आफ्रिकेचा एबी डेव्हेलियर्स आणि वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल यांनी हा रेकॉर्ड केला आहे. त्यांनी कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. रविवारी न्यूझीलंडविरोधातील सामन्यात दुसऱ्या ओव्हरला मॅट हेनरीला षटकार ठोकत रोहित शर्माने हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
रोहित शर्माने एकूण 53 षटकार ठोकले आहेत. या यादीत एबी डेव्हेलियर्स पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 2015 मध्ये 58 षटकार ठोकले होते. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ख्रिस गेलने 2019 मध्ये 56 षटकार ठोकले होते. यानंतर 53 षटकारांसह रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने अजून 6 षटकार ठोकले तर तो या यादीत पहिल्या क्रमांकावर जाऊ शकतो.