पुणे: नाशिक येथे पीस तायक्वांदो अकादमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत ७४ किलो वजनी गटात दमदार कामगिरी बजावताना २२ वर्षीय शिवांश त्यागीने सुवर्ण तर मुलींच्या ६२ किलो वजनी गटात सोनिया भारद्वाजने रौप्य पदकाची कमाई केली.
शेतकरी कुटुंबातून आलेल्या शिवांशला पहिल्यापासूनच या आक्रमक खेळाची आवड निर्माण झाली. शालेय स्पर्धांमध्ये शिवांशने दमदार कामगिरी करताना सीबीएससीच्या तब्बल सहा स्पर्धामध्ये सुवर्णपदक पटकावले. आग्रा, पुणे, हैदराबाद, कानपूर तसेच अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये चमकदार कामगिरी करताना आपले नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध केले होते.
सोनिया भारद्वाजने देखील या पूर्वी राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये शानदार कामगिरी बजावली आहे. स्पर्धेमध्ये ठसा उमटविणाऱ्या सोनिया सध्या गुजरात संघाकडून खेळते. अंतिम लढतीत उत्तराखंडच्या खेळाडूंकडून तांत्रिक गुणाच्या साहाय्याने पराभूत व्हावे लागले. मात्र, आगामी स्पर्धेसाठी तिने पुन्हा सरावाला सुरुवात केली असल्याचे सोनिया भारद्वाजने सांगितले.
पुण्यातील उद्योजक पुनीत बालन यांच्या वतीने शिवांश त्यागी व सोनिया भारद्वाज यांच्यासोबत सहकार्य करार करण्यात आला असून या कराराद्वारे या दोघांना खेळाचे साहित्य, प्रशिक्षक, आहार आदी गोष्टी पुनीत बालन ग्रुपच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
यावेळी बोलतांना पुनीत बालन म्हणाले की कोणत्याही खेळाडूला खेळत रहाण्यासाठी भक्कम आधाराची गरज असते. अनेकदा केवळ परिस्थितीमुळे अनेक गुणवान खेळाडूंना खेळापासून फारकत घ्यावी लागते. गुणवत्ता असून देखील देखील केवळ आर्थिक कारणामुळे खेळाडू खेळापासून दूर जावू नयेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.