खेळ

कोलकात्याच्या संघात ‘या’ विस्फोटक खेळाडूची एन्ट्री; लिटन दासची घेणार जागा

मुंबई : यंदाच्या आयपीएलच्या सीझनमध्ये अनेक रंगतदार सामने पाहायला मिळत आहे. हे सामने पाहता अजूनही प्ले ऑफचे संघ निश्चित झालेले नाही. आज कोलकाता आणि हैदराबाद यांच्यामध्ये लढत होणार आहे. यादरम्यान कोलकाताच्या संघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोलकाताचा फलंदाज लिटन दास याने कौटंबिक कारणामुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे. त्यामुळे त्याची रिप्लेसमेंट म्हणून कोलकात्याने वेस्ट इंडिजच्या जॉनसन चार्ल्स याला आपल्या संघात दाखल करून घेतले आहे. कोलकाता आणि आयपीएल यांनी ट्वीट करत लिटन दास याच्या रिप्लेसमेंटची माहिती दिली आहे.

कोण आहे जॉनसन चार्ल्स ?
चार्ल्स विकेटकिपर फलंदाज आहे. त्याने वेस्ट इंडिजकडून 41 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 971 धावा केल्या आहेत. चार्ल्स हा वेसट इंडिजच्या 2016 च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्यदेखील होता. कोलकात्याने लिलावात चार्ल्स याला 50 लाख रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. जॉनसन वेस्ट इंडीजसाठी 48 एकदिवसीय सामने खेळला आहे. यामध्ये त्याने दोन शतक आणि चार अर्धशतकासह 1283 धावा केल्या आहेत. चार्ल्स याने आतापर्यंत 224 टी20 सामने खेळले आहेत. या सामन्यात त्याने 5607 धावा केल्या आहेत.

कोलकाताच्या संघाची यंदाच्या सीझनमधील कामगिरी
2 वेळा चॅम्पियन राहिलेल्या कोलकात्याच्या संघाची यंदाच्या हंगामातील कामगिरी निराशाजनक राहिली आहे. कोलकाताचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर हा दुखापतग्रस्त असल्याने नितीश राणा कोलकाताचे नेतृत्त्व करत आहे. नीतीश राणाच्या नेतृत्वात यंदाच्या सीझनमध्ये कोलकाताला 9 सामन्यत फक्त 3 विजय मिळवता आले आहेत.