ऑलम्पिक क्रीडा प्रशिक्षणासाठी ‘पुनीत बालन ग्रुप’चा पुढाकार

1276 0

पुणे : ऑलम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताला अधिकाधिक पदके मिळावीत यासाठी आता ‘पुनीत बालन ग्रुप’ने आणखी एक पाऊल टाकले आहे. ऑलम्पिक क्रीडा प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र हॉकी फेडरेशनसमवेत ‘पुनीत बालन ग्रुप’ने पाच वर्षांचा सहकार्य करार केला आहे. याअंतर्गत खेळाडूंना प्रशिक्षण आणि प्रोत्साहन दिले जाणार आहे. ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन यांनी ही माहिती दिली.

क्रीडा क्षेत्रातील विविध उपक्रमासाठी ‘पुनीत बालन ग्रुप’कडून सातत्याने प्रोत्साहन दिले जाते. ऑलम्पिक क्रीडा स्पर्धेत अद्यापही भारताला आपला दबदबा निर्माण करता आलेला नाही. या स्पर्धेत अधिकाधिक पदके मिळावीत यासाठी विविध संघटना आणि फेडरेशन प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना आता ‘पुनीत बालन ग्रुप’नेही बळ देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र हॉकी फेडरेशनकडून ऑलम्पिक क्रीडा प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जातो. या प्रशिक्षणासाठी ‘पुनीत बालन ग्रुप’ पुढील पाच वर्षे आर्थिक सहकार्य करणार आहे. फेडरेशनचे अध्यक्ष व आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश आणि युवा उद्योजक पुनीत बालन यांच्यात नुकताच याबाबत करार करण्यात आला. त्याअंतर्गत खेळाडूंना प्रशिक्षण, प्रोत्साहनपर उपक्रम आणि आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

दरम्यान ‘पुनीत बालन ग्रुप’कडून टेबल टेनिस, खो-खो, बॅडमिंटन, हॅडबॉल, क्रिकेट अशा विविध खेळांनाही प्रोत्साहन देणारे अनेक वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. अल्टीमेट खो-खो, टेनिस लीग, प्रीमिअर बॅडमिंटन लीग, हॅन्डबॉल लीग आणि महाराष्ट्र आयर्नमन संघ यांचे स्वामित्वही पुनीत बालन यांच्याकडे आहे.

भारत आता जागतिक पातळीवर विविध क्षेत्रात आघाडी घेत आहे. क्रीडा क्षेत्रातही आघाडी घ्यावी आणि ऑलम्पिक स्पर्धेत अधिकाधिक पदे भारतीय खेळाडूंना मिळावीत यासाठी खेळाडूंना प्रशिक्षण मिळण्याची गरज आहे. भारताचा राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकी खेळामध्येही राज्यातील खेळाडू चमकावेत यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी ‘महाराष्ट्र हॉकी फेडरेशन’च्या माध्यमातून खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून आगामी काळात जास्तीत जास्त भारतीय खेळाडू ऑलम्पिकमध्ये पदके मिळवतील, अशी आशा आहे.

Share This News
error: Content is protected !!