Asian Games

Asian Games : भारताच्या महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेला हरवून रचला इतिहास

843 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एशियन गेम्समध्ये (Asian Games) भारताच्या महिला क्रिकेट संघाने इतिहास घडवत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. फायनलमध्ये भारताने श्रीलंकेवर 19 धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 7 बाद 116 धावा केल्या होत्या. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला 20 षटकात 8 बाद 97 धावा करता आल्या.

या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास स्मृती मानधनाने 45 चेंडूत 46 धावा तर जेमिमा रॉड्रिग्जने 40 चेंडूत 42 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त एकाही खेळाडूला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. तसेच गोलंदाजीमध्ये तितास साधूने 3 विकेट घेतल्या तर राजेश्वरी गायकवाडने दोन विकेट घेतल्या. याशिवाय दिप्ती शर्मा, पुजा वस्त्रकार, देविका वैद्य यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

तर श्रीलंकेकडून हसीनी परेरा आणि निलाक्षी डी सिल्वा यांना 20 पेक्षा जास्त धावा करता आल्या. तर ओशाडी रणसिंघेने 19 आणि चमारी अटापट्टूने 12 धावा केल्या. यांच्याशिवाय कोणालाच दुहेरी धाडसंख्या गाठता आली नाही. एशियन गेम्सच्या इतिहासात तिसऱ्यांदा क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. याआधी दोन वेळा क्रिकेटच्या स्पर्धाही घेण्यात आल्या होत्या. मात्र त्यावेळी भारताच्या महिला आणि पुरुष संघांनी सहभाग घेतला नव्हता.यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच एशियन गेम्समध्ये उतरलेल्या भारताच्या महिला क्रिकेट संघाने सुवर्णपदक जिंकत इतिहास घडवला आहे.

Share This News
error: Content is protected !!